-शिवाजी सावंत
गारगोटी- गारगोटी शहरासह परिसरात बुधवारी (ता. १५) रोजी संध्याकाळी अचानक वळीव पावसाने दमदार हजेरी लावली. जोरदार वारा, गारा, विजेचा कडकडाट करत जोरदार पाऊस झाला.या पावसामुळे बुधवारच्या येथील आठवडी बाजारात ग्राहक आणि व्यापारी यांची एकच तारांबळ उडाली. सुमारे अर्धा तास झालेल्या या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते.बाजारात व्यापाऱ्यांच्या मालाचे प्रचंड नुकसान झाले.पावसामुळे वातावरणात कामालीचा गारवा निर्माण झाला .
दुपारी चारच्या सुमारास अचानक ढग जमून येऊन विजेचा कडकडाट व जोरदार वाऱ्यासह वळीव पावसाने दमदार हजेरी लावली. अचानक सुरू झालेल्या या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. गारगोटी येथील बुधवारी आठवडी बाजार असल्याने आसपासच्या खेड्यातील शेतकरी आपल्या शेतातील पालेभाज्या घेऊन आले होते. पण अचानक सुरू झालेल्या पावसामुळे शेतकरी, व्यापारी यांचे मोठे नुकसान झाले. दमदार पावसामुळे रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. तर गटारी तुडुंब भरून वाहू लागल्या होत्या. येथील मुख्य बाजारपेठेत या पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात आल्याने अनेक व्यापाऱ्यांच्या भाज्या वाहून गेल्या.या पावसामुळे शेतातील पिकाना दिलासा मिळाला आहे.