कोल्हापूर : राज्यात सर्वात लक्षवेधी ठरलेल्या कोल्हापूर मधील दक्षिण, उत्तर, कागल, करवीर या मतदारसंघामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीने दणदणीत विजय मिळविल्याने जल्लोषाला उधाण आले आहे. ऋतुराज पाटील यांच्या अजिंक्यतारा, चंद्रकांत जाधव यांचा मंगळावर पेठेत, पी.एन. पाटील यांच्या टाकाळासमोरील घराजवळ, कागलमध्ये हसन मुश्रीफ यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष सुरु आहे. वारणेत विनय कोरे, गारगोटीत प्रकाश आबिटकर, हातकणंगले राजू आवळे, इचकरंजीत प्रकाश आवाडे व जयसिंगपूरमध्ये राजेंद्र पाटील (यड्रावकर), या विजयी उमेदवारांच्या घरासमोर कार्यकर्त्यांची तुफान गर्दी उसळली आहे. सुरुवातीपासून आघाडीवर असलेले चंदगडचे वंचितच उमेदवार अप्पी पाटील यांना शेवटच्या फेरीत धोबीपछाड देत राष्ट्रवादीचे राजेश पाटील यांनी साकारलेल्या विजयानंतर चंदगडमध्ये कार्यकर्त्यांचा आनंदाला पारावर उरला नाही. अंगावर गुलाल, हातात काँग्रेसचा झेंडा सोबतीला रॅली व जल्लोष असे वातावरण सर्वत्र दिसत आहे. यामध्ये विशेषत: महिला, युवती, व तरुणाईचा जोश दिसत आहे. यामुळे कोल्हापूर शहरात आता काँग्रेसचे वारे वाहू लागलेच चित्र सर्वत्र दिसू लागले. याविषयी कोल्हापूरमध्ये विजय कोणाचा असेल याची लोकमतचे अचूक वृत्त खरे ठरले आहे.
दुसऱ्या बाजूला भाजपा आणि शिवसेना यांचा पराभव झाल्याने पूर्णत: सन्नाटा पसरला आहे. भाजपचे दोन्ही तर शिवसेनेचे पाच उमेदवार पराभूत झाल्याने शिवसेनेचे असलेले वर्चस्व व भाजपाने घेतलेला वेग या निवडणुकीत कमी झाला आहे. मतदारांनी आपला कौल देत कोल्हापूरसह सर्व १० मतदारसंघातील चित्रच पालटून टाकले आहे. पुन्हा एकदा मतदारांची निर्णयक्षमता व कोल्हापूरचे राजकारण सर्वात भारीच असेच दाखवून देत, आमचं ठरलंय आणि तसच करून दाखवलय.. हे ब्रिद वाक्य खर करून दाखविले.
यात राज्यभरातून कोल्हापूरमधून चंदगडची दुपारी २ वाजेपर्यंत आघाडीवर असलेले वंचितचे अप्पी पाटील हे मागे पडले आणि शेवटच्या दोन फेरीमध्ये राजेश पाटील निवडून आले. त्यामुळे वंचितच विजयाचे स्वप्न येथे भंग पावल्याचे दिसले.येथील १० ही मतदार संघाचा निकाल जवळपास लागला असून दुपारी २.३० पर्यंत विजयी उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली आहेत. यामध्ये काँग्रेसचे ऋतुराज पाटील, चंद्रकांत जाधव हे विजयी झाले आहेत.
‘लोकमत’चा अंदाज तंतोतंत खरा
- कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीचे मतदान झाल्यावर ‘लोकमत’ने बुधवार (दि. २३)च्या अंकात कोणत्या मतदारसंघातून कोण विजयी होणार, यासंबंधी वर्तविलेला अंदाज तंतोतंत खरा ठरला. कोल्हापूर जिल्ह्यात युतीला ब्रेक लागणार आणि काँग्रेस आघाडी सुसाट असे म्हटले होते. त्यानुसारच निकाल लागल्याने ‘लोकमत’च्या वृत्ताची जोरदार चर्चा झाली.
- जिल्ह्यातील १0 पैकी सहा जागा काँग्रेस आघाडीला मिळाल्या. शिवसेनेला फक्त एकच राधानगरीची जागा मिळाली आहे. त्यातही ती पक्षापेक्षा आमदार प्रकाश आबिटकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विजय आहे. कोल्हापूर उत्तरमध्ये आमदार राजेश क्षीरसागर हे भाजप-ताराराणी आघाडीने मनापासून काम केले असेल, तरच विजयी होतील, असे म्हटले होते. या निकालावरून या आघाडीने क्षीरसागर यांना मनापासून साथ दिली नसल्याचे स्पष्ट होत आहे. अन्य सर्व निकाल ‘लोकमत’ने आधीच जाहीर केल्यानुसारच लागले आहेत.