मुरगूड : कागल तालुक्यातील करंजिवणे गावच्या हद्दीत असणाऱ्या तलावातील पाणी शेतीसाठी वापरण्यावरून करंजिवणे आणि हळदवडे या दोन गावांतील ग्रामस्थांमध्ये गेल्या महिन्यापासून वाद सुरू आहे. मुरगूड पोलिस, कागल तहसीलदार, स्थानिक पातळीवर बैठका पार पडूनसुद्धा या प्रश्नावर तोडगा निघालेला नाही. तलावात पाणी असूनही वादाने शेतातील पिके वाया जाण्याची स्थिती निर्माण झाली असल्याने करंजिवणेकर ग्रामस्थांनी पाटबंधारे खात्याला कोणत्याही परिस्थितीत तलावातील पाणी कालव्यात सोडण्याची मागणी केली आहे. त्यानुसार पाटबंधारे खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिस बंदोबस्तात पाणी सोडण्याचा निर्णय घेतला असून, हळदवडेकर मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. जर आमच्या मागणीचा विचार न करता पाणी सोडले तर रास्ता रोको आणि उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे हा पाणी वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे करंजिवणे तलावातून दौलतवाडी, बोळावी, बोळावीवाडी, ठाणेवाडी, पळशिवणे या गावांना पिण्याचे पाणी दिले जाते, तर हळदवडे आणि करंजिवणे या गावांतील शेतीला आणि पिण्यासाठी पाणी दिले जाते. काही दिवसांपूर्वी हळदवडे गावातील ग्रामस्थांनी आपल्याला पाणी पाहिजे, असे सांगून निढोरी येथील पाटबंधारे कार्यालयात रीतसर पाणीपट्टी भरून कालव्यातून आणि ओढ्यातून पाणी सोडण्याची विनंती केली होती. त्यानुसार रीतसर या तलावातून पाणी सोडले होते. सुमारे दोन तासांनंतर ही बातमी करंजिवणे ग्रामस्थांना समजली. त्यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ तलावावर जमले आणि तेथूनच पाटबंधारे विभागातील अधिकारी डी. बी. दारवाडकर यांच्याशी संपर्क साधून कालव्यातून सोडलेले पाणी बंद करण्याची मागणी केली. यावेळी ग्रामस्थ संतप्त झालेले पाहून दारवाडकरांनी कालव्यातून सोडलेले पाणी तत्काळ बंद केले आणि तेथूनच वादाला सुरुवात झाली करंजिवणेकर ग्रामस्थांनी कालव्यातून पाणी सोडून हळदवडे ग्रामस्थ आपल्या खासगी विहिरी भरून घेतात. त्यामुळे पाणी अजिबात सोडू नये, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे, तर तलाव बांधताना हळदवडे गावातील लोकांची जमीन जास्त गेली असून, वर्षभर करंजिवणे गावातील लोकच या तलावातील पाण्याचा फायदा घेतात. त्यामुळे शासनाच्या धोरणानुसार आम्हाला पाणी मिळालेच पाहिजे. अन्यथा सर्व ग्रामस्थ रस्त्यावर उतरतील, असा इशारा दिला आहे. दोन्ही गावकऱ्यांनी आपल्या मागणीची निवेदने मुरगूड पोलिस व पाटबंधारे अधिकाऱ्यांना दिली आहेत. पाणी हक्कावरून पेटलेला हा वाद या दोन गावांतील प्रमुखांनी चर्चा करून मिटविला पाहिजे. अन्यथा, शिवेला शिव असणाऱ्या या दोन गावांत पाण्यावरून संघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (वार्ताहर)१ सरतेशेवटी आपण आपल्या खर्चातून कालवा दुरुस्त करून घेतो. पाटबंधारे खात्याने पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन द्यावे, अशी मागणी हळदवडेकर ग्रामस्थांनी केली आहे. २ पाटबंधारे विभागातील अधिकारी डी. बी. दारवाडकर यांनी त्याला मान्यताही दिली आहे; पण दारवाडकर यांच्या मते या लोकांना कालव्याच्या खाली असणाऱ्या ओढ्यातून पाणी हवे आहे. ३ याला मात्र करंजिवणेकर ग्रामस्थांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी हा प्रश्न तत्काळ सोडवावा. अन्यथा, यातून या दोन्ही गावांत प्रचंड वाद निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्था निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हळदवडे-करंजिवणे ग्रामस्थ पाणीप्रश्नावरून आमने-सामने
By admin | Published: March 29, 2017 12:51 AM