लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : यंदा जर पाटबंधारे विभागाने पाणी सोडण्याचे अचूक नियोजन केले नसते तर कोल्हापूरच्या राजाराम बंधाऱ्याजवळची पाणी पातळी किमान ६५ फुटांपर्यंत गेली असती. या विभागाच्या ताज्या अहवालातच ही संभाव्य वस्तुस्थिती मांडण्यात आली आहे. तसे झाले असते तर कोल्हापूर शहर निम्म्याहून अधिक पाण्याखाली गेले असते आणि अन्य तालुक्यातील पूरग्रस्त गावांची संख्या आणखी २०० ने वाढली असती.
गेल्या पाच वर्षांपासून कोल्हापूर पाटबंधारे उत्तर विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवेडकर आणि त्यांचे सहकारी पंचगंगा खोऱ्यातील पाऊस, धरणे, विसर्ग याचा अभ्यास करत आहेत. यातून त्यांनी काही निष्कर्ष काढले आणि यंदा जोरदार पाऊस सुरू होण्याआधीच वारणा, दूधगंगा, राधानगरी, कुंभी, कासारी, तुळशी, कडवी या धरणांमधून सुमारे १६ टीएमसी पाणी आधीच सोडले. १ जून २०२१ पासून हे पाणी सोडण्यास सुरुवात केली. याचा परिणाम म्हणजे १६ टीएमसी पाणी धरणात साठण्यासाठी आधी जागा तयार करण्यात आली.
जूनमधील मोठ्या पावसानंतर पुन्हा पावसाने मोठी ओढ दिली. परंतु २१ ते २४ जुलै या चारच दिवसात जिल्ह्यात ढगफुटीसारखा पाऊस झाला. या चार दिवसात तुळशी धरणक्षेत्रात वार्षिक सरासरी पावसाच्या ८१ टक्के, राधानगरी धरणक्षेत्रात ३० टक्के, वारणा धरणक्षेत्रात ४० टक्के तर दूधगंगा धरणक्षेत्रात ३१ टक्के पाऊस झाला. परंतु या पावसाचे सर्व पाणी त्या त्या धरणांमध्ये साठायला जागा होती. त्यामुळे या धरणातून विसर्ग करावा लागला नाही. जे कोल्हापूरसह जिल्ह्यातील निम्म्या तालुक्यांच्या फायद्याचे ठरले. या काळामध्ये वरील चार धरणांमध्ये साडेसात टीएमसी पाणी साठले. हे पाणी आणि आधीच्यातील न सोडलेले आठ ते नऊ टीएमसी पाणी जर याच चार दिवसात सोडले असते तर मात्र राजाराम बंधाऱ्याची पातळी ही थेट ६५ फुटांपर्यंत गेली असती.
चौकट
म्हणून यंदा पूर पातळी लगेच घटली
२०१९ मध्ये ७ ऑगस्टला राजाराम बंधाऱ्याची दुपारी १२ वाजता पाणी पातळी ५५.७ फूट होती. ती धोका पातळीवर म्हणजे ४३ फुटांवर येण्यासाठी १४ ऑगस्ट उजाडला. म्हणजेच १२ फूट पाणी पातळी उतरण्यासाठी तब्बल सात दिवस लागले. कारण या काळात वरील धरणांमधून पाणी बाहेर पडत होते. यंदा मात्र २४ जुलैला पहाटे ३ वाजता सर्वाधिक पातळी ५६.३ फूट होती जी तिसऱ्या दिवशी म्हणजे २६ जुलैला रात्री ४८ फुटांवर आली. म्हणजेच तीन दिवसात आठ फुटाने ही पातळी कमी झाली. कारण यावेळी धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग होत नाही. म्हणूनच कोल्हापूर शहरातील लक्ष्मीपुरी, व्हीनस कॉर्नर, जिल्हाधिकारी कार्यालयासह अन्य ठिकाणचे पाणी झपाट्याने ओसरण्यास सुरुवात झाली.
चौकट
यांचे परिश्रम कारणीभूत
पाऊस किती पडावा हे जरी कोणाच्या हातात नसले तरी तो पडण्याआधी काही तरी ‘रिस्क’ घेऊन निर्णय घ्यावे लागतात. रोहित बांदिवडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवीण पारकर, समीर निरूखे, विवेक सुतार राधानगरी, मिलिंद किटवाडकर, टी.एस. धामणकर वारणा, भाग्यश्री पाटील, एच. बी. कुंभार दूधगंगा, विजय आंबोळे तुळशी, बाबजी चाचुर्डे कासारी, खंडेराव गाडे कुंभी, पूरनियंत्रण कक्ष समन्वयक प्रदीप पाटील, संदीप दावणे, त्यांचे सहकारी उत्तम जाधव, संदीप नलवडे या सर्वांचे या कामी परिश्रम कारणीभूत आहेत.
चौकट
चार दिवसातील धरणक्षेत्रातील पावसाची आकडेवारी मिलीमीटरमध्ये
राधानगरी - तुळशी - दूधगंगा - वारणा - कोल्हापूर
२१/२२/२३/२४ जुलै - १०५० १४५८ ७७४ ११५२ ५२६
वार्षिक पाऊस - ३८०० १८०० २५०० २८०० ९००
टक्केवारी - ३० टक्के ८१ टक्के ३१ टक्के ४० टक्के ५८ टक्के
चौकट
६५ फूट पातळी झाली असती तर
चार दिवसांपूर्वी ५६.३ फुटांवर राजाराम बंधाऱ्याची पातळी गेल्यानंतर रिलायन्स मॉलपर्यंत पाणी आले. ते झपाट्याने वाढत गेले. जर हीच पातळी ६५ फुटांपर्यंत गेली असती तर गंगावेश उमा टॉकीज, राजाराम रोड, सीपीआरच्या पुढच्या बाजुपर्यंत पाणी आले असते. शाहूवाडी, गगनबावडा, करवीर, शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील पूरग्रस्त गावांची संख्या झपाट्याने वाढली असती. परंतु जवळपास १६ टीएमसी पाणीपात्रात आधी आल्याने आणि नंतरचे पावसाचे पाणी धरणातच साठवले असल्याने ही दुर्दैवी वेळ आता तरी टळली ही वस्तुस्थिती आहे.
कोट
पूराचा अभ्यास आम्ही २०१७ पासून करत आहोत. हवामान विभाग आणि अन्य तीन साईटसचा सातत्याने अभ्यास करून आणि प्रत्यक्षातील आकडेवारीवरून आम्ही काही निष्कर्ष काढले. याधीचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनीही पाणी आधी सोडण्याबाबतच्या संकल्पनेला पाठबळ दिले होते. त्यामुळे १ जून पासूनच पाणी सोडायला सुरुवात केली. परिणामी महापुराचा यापेक्षाही जास्त उद्भवणारा मोठा धोका टाळण्यात यश आले.
रोहित बांदिवडेकर
कार्यकारी अभियंता, कोल्हापूर उत्तर पाटबंधारे विभाग
२६०७२०२१ कोल रोहित बांदिवडेकर