कोल्हापूर : महिलांच्या रूपाने देशाची पन्नास टक्के शक्ती घरातच अडकून पडली आहे. या शक्तीला प्रेरणा व प्रोत्साहन देऊन, सक्रिय करून गतिमान करण्यासाठी सरकार पुढाकार घेणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. उत्पादित मालाची गुणवत्ता ठिकवण्यासाठी बचत गटांना मार्केटिंगबरोबर प्रशिक्षणाची गरज आहे. त्याशिवाय बचत गट स्पर्धेत टिकू शकणार नाही, असेही त्यांनी सांगितले. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व जिल्हा परिषदेच्या वतीने खराडे कॉलेज कॅम्पस, शिवाजी पेठ येथे आयोजित केलेल्या ‘ताराराणी महोत्सवा’स शनिवारी प्रारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विमल पाटील होत्या. बचत गटांच्या उत्पादित मालाची विक्री होईलच; पण त्याची स्तुती होण्यासाठी प्रयत्न करावेत. देशातील प्रत्येक माणसाने कष्ट करून जगले पाहिजे, असा सरकारचा प्रयत्न आहे. अनुदान, कर्ज, कर्जमाफी या गोष्टींचा विचार त्या- त्यावेळी घेतला जातो; पण एखादी व्यक्ती मोकळी राहिली की, तिच्यात विकृती तयार होते. त्यातूनच तरुण-तरुणींमध्ये टिंगलखोरी वाढत जाते. यासाठी आपल्या जीवनातील जास्तीत जास्त वेळ पैसे कमविण्यासाठी खर्च केला पाहिजे. बचत गटांना सक्षम करण्यासाठी तालुकास्तरावर विक्री केंद्रे सुरू करण्याबरोबरच बिनव्याजी व विनाभाड्याने विक्री व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे चंद्रकांतदादा पाटील यांनी म्हटले. बचत गटांनी आपल्या उत्पादित मालाचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन करीत खासदार धनंजय महाडिक म्हणाले, भागीरथी महिला मंडळातर्फे बचत गटांच्या उत्पादित मालाला बाजारपेठ मिळावी, यासाठी आॅनलाईन शॉपिंगची सोय करून दिली आहे. जिल्हा विक्री केंद्रे बंद पडली असून, ती पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी करीत अध्यक्ष विमल पाटील म्हणाल्या, ताराराणी महोत्सव हा महिलांना हक्काचे व्यासपीठ आहे, त्याचा लाभ घ्यावा. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी स्वागत केले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांनी आभार मानले. यावेळी महापौर हसिना फरास, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, माजी महापौर सई खराडे, अभिजित तायशेटे, सीमा पाटील, अश्विनी धोत्रे, अर्चना खाडे, प्रकल्प संचालक डॉ. एच. ई. जगताप, युनियन बॅँकेच्या जिल्हा समन्वयक तृप्ती गायकी, लीड बॅँकेचे व्यवस्थापक एस. जी. किणिंगे, आदी उपस्थित होते. सरकार चालविताना हैराण! गेल्या अडीच वर्षांत राज्यातील विविध विभागांतील अधिकाऱ्यांचे कामकाज जवळून पाहिले आहे. सरकार चालविताना आपण हैराण झाल्याची उद्विग्न भावना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली. ‘ताराराणी महोत्सवा’त पहिल्या दिवशी दीड लाखाची उलाढाल झाली. महोत्सवात १५८ स्टॉल असून, त्यामध्ये ३९ खाद्यांचे, तर ११९ बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. बुधवार (दि. १५) पर्यंत महोत्सव चालणार आहे. ३६ बचत गटांचा गौरव!जिल्ह्णातील ३६ बचत गटांचा ‘राजमाता जिजाऊ स्वावलंबन’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. प्रत्येक तालुक्यातील तीन बचतगटांना मंत्री पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. मोबाईल अॅपचे उद्घाटनग्रामीण भागातील जनतेला सहजपणे जिल्हा परिषदेची माहिती व सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी मोबाईल अॅप तयार केले आहे. त्याचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते झाले.
देशाची महिलारुपी अर्धी शक्ती घरातच
By admin | Published: March 11, 2017 11:47 PM