संतोष मिठारी ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील निम्मे प्राध्यापक कंत्राटी पद्धतीने कार्यरत आहेत. त्यांचे प्रमाण ४५ टक्के आहे. गेल्या तीन वर्षांपासून ११३ पदे रिक्त आहेत. त्याचा शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे.विद्यापीठासाठी प्राध्यापकांची एकूण २६४ पदे मंजूर आहेत. त्यांपैकी सध्या शासनाकडून मिळणाऱ्या वेतन अनुदानावर १५१ प्राध्यापक कार्यरत आहेत. शासनाकडून भरती बंदी असल्याने विद्यापीठ प्रशासनाने अकरा महिन्यांच्या करारावर कंत्राटी पद्धतीने ११९ प्राध्यापकांची नियुक्ती केली आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, सामाजिक शास्त्रे, भाषा, वाणिज्य व व्यवस्थापन अशा सर्वच विद्याशाखांच्या अधिविभागांमध्ये कंत्राटी तत्त्वावरील प्राध्यापक कार्यरत आहेत. त्यातील अनेक प्राध्यापक दरवर्षी बदलत असल्याने शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे. संशोधनाच्या पातळीवर विद्यापीठाचे आवश्यक त्या प्रमाणात कामगिरी होत नसल्याचे वास्तव आहे. त्यासह कंत्राटी तत्त्वावरील प्राध्यापक भरतीच्या प्रक्रियेत विद्यापीठ प्रशासनाचा खर्च होणारा वेळ आणि पैसा वर्षागणिक वाढत आहे. त्याचा प्रशासनावर ताण येत आहे.वेतनातील फरकाचा परिणाम कायमस्वरूपी असणाºया प्राध्यापकांना दरमहा शासननियमानुसार वेतन मिळते. विद्यापीठ स्वनिधीतील प्राध्यापकांना दरमहा ४० हजार, तर ११ महिन्यांच्या कंत्राटी तत्त्वावरील प्राध्यापकांना २१,६०० रुपये वेतन मिळते. कायमस्वरूपी आणि विद्यापीठ स्वनिधीतील प्राध्यापकांच्या वेतनाच्या तुलनेत कंत्राटी तत्त्वावरील प्राध्यापकांचे वेतन कमी आहे. मात्र, कामाचे स्वरूप एकच आहे.
शिवाजी विद्यापीठातील निम्मे प्राध्यापक कंत्राटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 11:47 PM