हलकर्णी : नरेवाडी (ता. गडहिंग्लज) येथील तलावातून होणारा थेट उपसा वीज कनेक्शन बंद केल्याने बंद करण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून हलकर्णीकरांचा पाणीपुरवठा खंडित झाला होता. यावर नवनिर्वाचित युवा सदस्यांनी तात्पुरता मार्ग न काढता हे काम नियमाप्रमाणे करण्यासाठी थेट टेंडर काढत या कामाची एकाच दिवसात सुरुवात केली. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य पहिल्यांदाच एवढे कार्यतत्पर दिसून आल्याने हलकर्णीकरांना दरवर्षी उन्हाळी पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार नाही. ३०० मीटर पाईपलाईन व वीज कनेक्शन असे या कामाचे स्वरूप आहे.
एप्रिलमध्ये पाझर कमी झाल्याने हलकर्णीला दरवर्षी पाणीटंचाई जाणवते. याला उपाय म्हणून थेट तलावातून पाणी उपसा तात्पुरता उपाय केला जातो. यामध्ये अवैध वीज कनेक्शन, उघड्यावरील पाईप हे धोकादायक असल्याने नरेवाडी ग्रामस्थांनी याची तक्रार केल्याने वीज कनेक्शन बंद केले.
दरम्यान, गावाला आठवडाभर पाणी टंचाईला सामोरे जावे लागले. यासाठी बैठक न बोलताना उपसरपंच सलीम यमकनमर्डी, शिवा मठपती, सुजित पाटील, अविनाश दुध्यागोळ, नीता मऱ्यापगोळ, अश्विनी पाटील, आक्काताई भोसले आदी सदस्यांनी एक होऊन याकामी प्रयत्न केले.