कोल्हापूर : पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल आज, गुरुवारी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने आॅनलाईन जाहीर केला. त्यात राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत ‘कोल्हापुरी टॅलेंट’ झळकले. त्यात पूर्व माध्यमिकमध्ये (चौथी) ग्रामीण भागात करण विजय पाटीलने (दौलत मराठी विद्यामंदिर, हलकर्णी) ३०० पैकी २९७ गुणांसह प्रथम क्रमांक पटकाविला तसेच माध्यमिकमध्ये (सातवी) शहरी विभागात अथर्व महावीर चौगुलेने (सेंट झेवियर्स हायस्कूल) ३०० पैकी २८६ गुणांसह, तर ग्रामीण विभागातून रोहिणी विठोबा शेवाळे (विद्यामंदिर सुळे) आणि प्रथमेश राजेंद्र सणगर (जिल्हा परिषद शाळा, परिते) यांनी २८२ गुण मिळवत द्वितीय क्रमांक मिळविला.जिल्ह्यातील चौथी, सातवीचे एकूण ५६ हजार ७९५ विद्यार्थी या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी बसले होते. त्यापैकी ३५ हजार १२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यातील शहर आणि ग्रामीण विभागातून एकत्रितपणे ९१ विद्यार्थी-विद्यार्थिनी राज्याच्या गुणवत्ता यादीत झळकले आहेत. त्यातील अधिकतम विद्यार्थी-विद्यार्थिनी या जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या शाळांमधील आहेत. यावर्षी सातवीमध्ये राज्यात कोल्हापूर प्रथम क्रमांकावर, तर चौथीमध्ये तृतीय स्थानी आहे. त्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत चौथीचा निकाल ३.७५ टक्क्यांनी वाढला असून सातवीचा निकाल ४.६० टक्क्यांनी घटला आहे तसेच राज्य गुणवत्ता यादीतील चौथीच्या विद्यार्थ्यांची संख्या ५९ ने घटली, तर सातवीमध्ये अवघ्या दोनने वाढली आहे. या परीक्षेचा निकाल आज दुपारी तीन वाजता पुण्यातील परीक्षा परिषदेने संकेतस्थळावरून जाहीर केला. त्याची माहिती मिळताच गुणवत्ता यादी पाहण्यासाठी शिक्षक, पालकांची धावपळ सुरू होती. गुणवत्ता यादीत झळकलेल्या विद्यार्थ्यांवर नातेवाईक, मित्रमंडळींनी प्रत्यक्ष भेटून तसेच दूरध्वनीवरून अभिनंदनाचा वर्षाव केला. (प्रतिनिधी)..........................................................................................निकाल दृष्टिक्षेपात...* चौथीच्या निकालाची टक्केवारी : ६४.३६* सातवीच्या निकालाची टक्केवारी : ५६.३७* गुणवत्ता यादीत झळकलेले कोल्हापूरचे विद्यार्थी : ९१* चौथीचे शहरी विभागातील विद्यार्थी : १२* ग्रामीण विभागातील विद्यार्थी : २१* सातवीचे शहरी विभागातील विद्यार्थी : ११* ग्रामीण विभागातील विद्यार्थी : ४७
हलकर्णीचा करण पाटील राज्यात प्रथम
By admin | Published: July 25, 2014 12:47 AM