संतोष पाटील, कोल्हापूर : महापालिकेचे अधिकारी व नगरसेवकांना गप्प बसविण्यासाठी काय लागते...? पैशांचे एक बंडल दिले की, यांची तोंडे बंद होतात. आपल्या मिंध्यात असलेली ही पिलावळ कारवाई करूच शकत नाही, अशा आशयाचा उल्लेख असलेल्या क्लिप्स् गेले काही दिवस वॉटस् अॅपवर फिरत आहेत. महापालिकेतील पदाधिकार्यांनीही ही क्लिप ऐकली अन् कारवाईचा विडा उचलला. महापालिका या प्रकरणी जुजबी नाममात्र कारवाई करेल, हा अंदाज फोल ठरला. याउलट कारवाईवेळी अनेकांनी तोंडदेखलेपणा करत खाल्या मिठाला जागण्याचाही प्रयत्न केला. न्यायालयाच्या निकालामुळे अतिक्रमणे झालेली जागा महापालिकेची की उचगाव हद्दीतील, या वादावर पडदा पडला तरी अनेकांचे हात परिसरातील व्यापार्यांनी ओले केल्याने कारवाईबाबत शंका निर्माण झाली होती. आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी महासभेत आदेश देऊनही कारवाईबाबत दिरंगाई होत होती. दरम्यान, परिसरातील व्यापार्यांनी नगरसेवक व अधिकार्यांनी कशाप्रकारे पैसे घेतले, क से मॅनेज झाले, याबाबत भाष्य करणारी क्लिप सोशल नेटवर्कवर फिरत असल्याचे पदाधिकार्यांच्या कानावर गेले. गुजराती व मराठी भाषेत असणार्या या क्लिप ऐकताच स्थायी समिती सभापती सचिन चव्हाण यांनी स्थायी बैठकीतूनच कारवाईसाठी लागणार्या पोलीस बंदोबस्ताच्या मागणीसाठी पोलीस मुख्यालय गाठले व अतिक्रमणे संपविण्याचा विडाच उचलला. काही नगरसेवकांनी पैशांची मस्ती उतरविण्याची घेतलेला विडा कारवाईने पूर्ण केला, अशी चर्चा महापालिकेत सुरू आहे. ‘झारीतील शुक्राचार्य’ लांबच अतिक्रमण केलेल्या १३८ मिळकतींपैकी ३८हून अधिक मिळकतींना नोटीस पोहोचणार याची व्यवस्था महापालिकेतील एका गटाने केली. कारवाईच्या पहिल्या दिवशी तनवाणी हॉटेल व दुलाणीसारखे बडे मिळकतधारक वाचले. बड्यांना वाचविणार्या महापालिकेतील ‘झारीतील शुक्राचार्यां’वर आता कारवाई कधी होणार, याबाबत चर्चा सुरू आहे. शेवटपर्यंत आशा अतिक्रमण हटविणारी यंत्रणा दारापर्यंत आली तरी अनेक व्यावसायिक बिनधास्त होते. दारात जेसीबी मशीन लागले तरी दुकानातील साहित्य हलविले नव्हते. ‘गॉडफादर’मुळे आपल्यावर कारवाई होणार नाही, अशी आशा कारवाईच्या धडाक्यात मावळली. कारवाई सुरू असताना व्यापारी कानाला फोन लावून कारवाई थांबविण्याबाबत अंतिम घटकेपर्यंत प्रयत्न करत होते.
पडला हातोडा; मस्तवाल व्यावसायिकांना धडा
By admin | Published: May 27, 2014 12:47 AM