कोल्हापूर : महापालिकेच्या वतीने पांजरपोळ येथील हरितपट्ट्यातील अतिक्रमणांवर हातोडा टाकला. यावेळी ६४४ चारचाकी गाड्या, ११ शेड, १२ टपऱ्या व ६ केबीन हटविण्यात आले. विभागीय कार्यालय क्रमांक ३ राजारामपुरीअंतर्गत ही कारवाई झाली. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी शहरातील ओपनस्पस, हरितपट्ट्यातील अतिक्रमण, अनधिकृत फलक हटविण्याच्या सक्त सूचना केल्या असून, महापालिकेची यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लागली आहे.पांजरपोळ इंडस्ट्रीचे दक्षिण बाजू रस्त्यालगत ओम गणेश मंगल कार्यालय ते यादवनगरपर्यंतच्या हरितपट्ट्यामधील ६ शेड, चारचाकी वाहने ४२८, केबिन ४, जाहिरात फलक काढण्यात आले. शास्त्रीनगर मैदान दक्षिणेकडील ५ शेड व १८ बोर्ड, २१६ चारचाकी गाड्या हटवून महापालिकेच्या गाळ्यासमोरील १२ टपऱ्या काढून जप्त केल्या.
शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्या मार्गदर्शनाखाली उपशहर अभियंता बाबूराव दबडे, पंडित पोवार, कनिष्ठ अभियंता सुरेश पाटील, तानाजी गेजगे यांनी कारवाई केली. अतिक्रमण कारवाईची मोहीम येथून पुढे तीव्र केली जाणार आहे. तरी संबंधितांनी अतिक्रमणे काढून घ्यावीत, असे आवाहन महापालिकेने केले आहे.