: मराठा समाजासाठी होणार सुसज्ज मराठा भवन
मुरगूड : मुरगूड शहरामध्ये सुसज्ज छत्रपती शिवाजी महाराज मराठा भवन बांधण्याचा तसेच मुरगूडमधील धोकादायक इमारतींची शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय कोल्हापूर यांच्याकडून तपासणी करून अशा इमारती जमीनदोस्त करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या नगर परिषदेच्या ऑनलाईन सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. याशिवाय शहरातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पगार नियमित होत नसलेने सदर कंपनीचा ठेका रद्द करण्याचा निर्णय ही एकमताने मंजूर केला.
मुरगूड पालिकेची ऑनलाईन सर्वसाधारण सभा झाली. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष राजेखान जमादार होते. सभेत जिल्हा परिषदेप्रमाणे नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना मेडिक्लेम असावा, अशी मागणी नगरसेवक मारुती कांबळे, राहुल वंडकर, जयसिंग भोसले यांनी केली. साधना कांबळे यांच्या वारसास सफाई कामगार पदावर घेण्यास सभेने मंजुरी दिली. स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना निधी उपलब्धतेनुसार त्यांची रक्कम देण्यात येणार असून त्यांच्या वारसांना सफाई कामगार म्हणून घेण्यास ही सभेने मंजुरी दिली आहे.
दिव्यांग निधी कसा वाटायचा याबाबत मार्गदर्शन मागविण्याचे ठरले. तसेच १५ व्या वित्त आयोग निधीतून सेल्डर व बेलिंग मशिन खरेदी करण्यास सभेने मान्यता दिली. नगर परिषद हद्दीत हाय मॉस्ट पोल बसवण्यास ही मंजुरी दिली. शहरातील रस्त्याच्या कामांना मुदतवाढ देण्यात आली तुकाराम चौकातील सांडपाण्याचा निचरा करावा, अशी सूचना हेमलता लोकरे यांनी मांडली. नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामाची व कोरोनाची माहिती नगरसेवक सुहास खराडे यांनी मागितली. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या खेळाडूसाठी पालिकेने आर्थिक तरतूद करावी, अशी मागणी जयसिंग भोसले, मारुती कांबळे यांनी केली. डीडीटी पावडर फवारणी करण्याची मागणी विशाल सूर्यवंशी यांनी केली.
सभेत उपनगराध्यक्षा रेखाताई मांगले, नामदेव मेंडके, जयसिंग भोसले, सुहास खराडे, बाजीराव गोधडे, विशाल सूर्यवंशी, मारुती कांबळे, विरोधी पक्षनेता राहुल वंडकर, रवी परीट, सुप्रिया भाट, प्रतिभा सूर्यवंशी, हेमलता लोकरे, रंजना मंडलिक, अनुराधा राऊत, वर्षाराणी मेंडके, संगीता चौगले यांनी सहभाग घेतला. सभेस पालिका मुख्याधिकारी हेमंत निकम, प्रकाश पोतदार, अनिकेत सूर्यवंशी, जयवंत गोधडे, रणजित निंबाळकर, सुनील पाटील, रमेश मुन्ने, मारुती शेट्टे, अमर कांबळे, विनायक रणवरे, मंदार सूर्यवंशी यांनी सभागृहास माहिती पुरवली.