म्हाकवे : चिकोत्रा प्रकल्पातील अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे पाटबंधारे प्रकल्पाने शेतीच्या पाणी वापरावर मर्यादा आणल्या आहेत. त्यामुळे चिकोत्रा खोऱ्यातील ऊस पाण्याअभावी वाळून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये, याची खबरदारी हमीदवाडा येथील सदाशिवराव मंडलिक कारखान्याने गांभीर्याने घेतली आहे. त्यासाठी या भागात तोडणी यंत्रणा हंगामाच्या सुरुवातीपासूनच वाढविली आहे.कारखान्याने ८७ दिवसांत तालुक्यातील दोन लाख ६६ हजार ८३ मे. टन उसाचे गाळप केले आहे. यापैकी एक लाख दोन हजार ३७३ मे. टन इतका ऊस हा केवळ चिकोत्रा खोऱ्यातून गाळपास आणला आहे. म्हणजेच एकूण गाळपापैकी ३६ ते ३७ टक्के ऊस हा चिकोत्रा खोऱ्यातून उचल केला आहे. इतर कार्यक्षेत्रांपेक्षा या खोऱ्यातील तोडणी कार्यक्रम एक महिन्याने पुढे असल्याची माहिती कारखाना प्रशासनाने दिली.मंडलिक कारखान्याने या खोऱ्यात दररोज १४00 ते १५00 मे. टन उचल करून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. यासाठी ४८ ट्रेलर ट्रॅक्टर, २७ छकड्या, पाच ट्रक आणि २0६ बैलगाड्या इतकी यंत्रणा देऊन प्राधान्य दिले आहे.चिकोत्रा धरणात यंदा केवळ ४६ टक्केच पाणीसाठा झाला. त्यामुळे या खोऱ्यातील सुमारे ३५ गावांना पिण्याच्या पाण्यासाठी राखीव पाणीसाठा ठेऊन शेतीला पाणी देताना प्रशासनाची दमछाक होत आहे.कारखान्याचे अध्यक्ष प्रा. संजय मंडलिक, कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस, या खोऱ्यातील संचालक रामचंद्र सांगले, आनंदा मोरे, विश्वास कुराडे, नंदकुमार घोरपडे, शहाजी यादव, आप्पासाहेब नांदेकर, सर्व संचालक मंडळाने हा घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे.
मंडलिक कारखान्याचा चिकोत्रा खोऱ्याला हात
By admin | Published: February 12, 2016 11:56 PM