लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : अनेक वर्षे आंदोलने, बैठका, मोर्चे काढूनही महसूलचे अधिकारी व वन विभागाच्या अकार्यक्षम कारभारामुळे चांदोली अभयारण्यग्रस्तांना असह्य यातना सोसाव्या लागत आहेत. त्यामुळे अभयारण्याचे व्यवस्थापन प्रकल्पग्रस्तांच्या ताब्यात द्या, ते वन कर्मचाऱ्यांपेक्षा चांगले संगोपन करतील, वन कर्मचाऱ्यांना बसून पगार घेऊद्या, अशी मागणी श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी शुक्रवारी केली.
वारणा धरणग्रस्त व चांदोली अभयारण्यग्रस्तांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुुरू असून डॉ. भारत पाटणकर यांनी शुक्रवारी प्रसिद्धीपत्रकातून महसूल व वन विभागाला वरील आवाहन केले आहे.
अभयारण्यग्रस्तांना आपल्या मूळ निवासापासून उठवून बाहेर माळरानावर आणून टाकले. तेथे हक्काची जमीन नाही, नोकरी नाही, रोजगार नाही. यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या सहनशीलतेचा अंत झाला असून महसूल व वन खात्याने अभयारण्याचे व्यवस्थापन अभयारण्यग्रस्तांकडे द्यावे, ते जंगलाचे संगोपन करतील, पर्यावरण राखतील व पर्यटन विकास करून आपला संसार चालवतील. वन कर्मचारी असताना जंगल व वन्यप्राणी यांची काय अवस्था आहे, हे नरक्या तस्करीतून पाहिले आहे.
ठिय्या आंदोलनात प्रकल्पग्रस्तांसोबत संपत देसाई, पांडुरंग कोठारी, मारुती पाटील, विनोद बडदे, आकाराम झोरे उपस्थित होते.
---