उद्धव गोडसे, लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : 'गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणा-या एएस ट्रेडर्स कंपनीचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून योग्य रीतीने होत नाही. या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्यामुळे सीबीआय किंवा ईडीकडे तपास सोपवावा,' अशी मागणी एएस ट्रेडर्स विरोधी कृती समितीने केली आहे. याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती विरोधी कृती समितीने सोमवारी (दि. २) पत्रकार परिषदेत दिली.
विरोधी कृती समितीने दिलेल्या माहितीनुसार, एएस ट्रेडर्स विरोधात गुन्हा दाखल झाल्यापासूनच पोलिसांनी योग्य पद्धतीने तपास केला नाही. शाहूपुरी पोलिस ठाण्यातील तत्कालीन तपास अधिकारी श्रीकांत इंगवले यांनी तपासात त्रुटी ठेवल्याबद्दल त्यांची चौकशी सुरू आहे. त्यानंतर आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या अधिका-यांनीही केलेला तपास संशयाच्या भोव-यात आहे. या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार लोहितसिंग सुभेदार याच्या अटकेला दहा दिवस उलटले तरी पोलिसांनी तपासातील माहिती जाहीर केलेली नाही. अटकेतील संशयितांकडून जप्त केलेल्या मुद्देमालाची माहिती दिली जात नाही. गुन्हा दाखल असलेले संशयित कोल्हापुरात वावरत आहेत, तरीही त्यांना अटक केली जात नाही. त्यामुळे या गुन्ह्याचा तपास सीबीआय किंवा ईडीकडे सोपवावा, अशी मागणी विरोधी कृती समितीने केली. पत्रकार परिषदेसाठी रोहित ओतारी, विश्वजीत जाधव, गौरव पाटील, महेश धनवडे, अमित साळोखे, योगेश लाड, सुनील कदम आणि सुनीलसिंह चव्हाण उपस्थित होते.