लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : अनावधानाने अगर रागाच्या भरात घडलेल्या चुकीची शिक्षा म्हणून गजाआड राहावे लागत असले तरीही त्यांना कुटुंबाचीच चिंता लागून राहिलेली असते. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती कळंबा कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या सुमारे ८३ कैद्यांची हीच अवस्था आहे. शिक्षा म्हणून ते गजाआड असले तरीही त्यांचे हात हे प्रामुख्याने त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठीच राबत आहेत. कारागृहातील कामाच्या मिळणाऱ्या रकमेपैकी फक्त दहा टक्के स्वखर्चासाठी ठेवून उर्वरित रक्कम ते दरमहा कुटुंबाच्या खर्चासाठी पाठवतात. त्यातून त्यांची कुटुंबाबाबतची आस्था दिसते.
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती कळंबा कारागृहात अडीच हजारहून अधिक कैदी होते, कोरोनामुळे पॅरोल रजेवर ६९५ जण बाहेर पडले. सद्यस्थितीत कारागृहात १,९६८ कैदी आहेत. यापैकी ७३५ कैदी हे विविध गुन्ह्यांत शिक्षा भोगत आहेत. उर्वरित कैदी हे न्यायालयीन बंदी आहेत.
या कारागृहात कैद्यांकडून शेतीकाम, सुतारकाम, बेकरी प्राॅडक्टस्, यंत्रमाग, शिवण, धोबी, लोहार, जरीकाम आदी कामे करुन घेत त्या मोबदल्यात त्यांच्या खात्यावर रक्कम जमा केली जाते. या जमा रकमेपैकी दरमहा साडेचार हजार रुपयेपर्यंत प्रत्येक कैद्याला कॅन्टीनमधील चमचमीत खाद्यावर खर्च करता येतो. त्याप्रमाणे ते खर्चही करतात. पण सुमारे ८३ कैदी असे आहेत की, ते अत्यावश्यक गरजेपुरतेच दरमहा फक्त २०० रुपये खर्च करुन उर्वरित रक्कम घरखर्चासाठी नित्यनियमाने पाठवतात. घरी पत्नीला खर्चासाठी, मुलीच्या शिक्षणासाठी, आई-वडिलांच्या आजारपणासाठी तसेच उदरनिर्वाहासाठी सुमारे १,८०० रुपयांपासून ते २,२०० रुपयांपर्यंत रक्कम घरी पाठवतात.
पोटाला चिमटा देत फक्त साबण, बिस्कीटांवर खर्च
कारागृहातील अनेक कैदी कामाची जमा होणारी रक्कम अगर नातेवाईकांकडून दरमहा खात्यावर जमा केलेली रक्कम कारागृहातील कॅन्टीनमध्ये चैनीवर उडवतात. पण घरची चिंता असणारे हे ८३ कैदी स्वत:च्या पोटाला चिमटा देत अत्यावश्यक म्हणून आंघोळीचा साबण व बिस्कीटे यावर दरमहा फक्त २०० रुपये खर्च करतात. तर कारागृहातीलच नेहमीचे जेवण घेतात.
चांगल्या वागणुकीला विशेष माफी
चांगली वागणूक असणाऱ्या अशा कैद्यांना प्रशासनामार्फत इन्सेंटिव्ह म्हणून विशेष माफी दिली जाते. एकूण शिक्षेमध्ये त्यांना सूटही दिली जाते.
कैद्यांची एकूण स्थिती
- न्यायालयीन कैदी : १२३३
- सिध्ददोष कैदी : ७३५
- पॅरोल रजेवर बाहेर - ६९५
- एकूण : १९६८ (सध्या शिल्लक कैदी)
कळंबा कारागृहातील कैद्यांची स्थिती
तपशील : पुरुष - स्त्री
१) न्यायालयीन कैदी : ८०७ - १९
२) साधी शिक्षा कैदी : १४४ - ००
३) सक्तमजुरी कैदी : ३८७ -११
४) सि.अन्वे/ रात्र प. : ३९/६८- ०२
५) मृत्यूदंड : ०१ - ००
६) परदेशी कैदी : १९ -०२
७) मोका कैदी : ४०५ - ०२
८) स्थानबध्द : ०३ - ००
९) ओपन कैदी : १७ -००
१०) लाल पट्टी (पळपुटे) : ४२ - ००
कोट...
‘कारागृहात कैद्यांकडून सुधारणा होण्यासाठी त्यांच्याकडून कामे करुन घेतली जातात. ज्या कैद्यांमध्ये सुधारणा दिसून येते, त्यांना शिक्षेमध्ये सूट देण्यासाठी विशेष प्रस्ताव गृह विभागाकडे पाठवला जातो. - चंद्रमणी इंदूरकर, अधीक्षक, जिल्हा मध्यवर्ती कळंबा कारागृह, कोल्हापूर.