आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. २४ : दहावीच्या गुणपत्रिका घेण्यासाठी दुपारनंतर विद्यार्थ्यांनी गर्दी केली. अनेक शाळांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना शाबासकी दिली शिवाय त्याच्या अभिनंदनाचे फलक शाळा परिसरात झळकले होते. करिअर निवडीबाबत मार्गदर्शन करणारा कल अहवाल हातात पडल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंद, उत्साह पसरला होता.
दहावीचा आॅनलाईन निकाल १३ जूनला जाहीर झाला. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागीय कार्यालयातर्फे जिल्ह्यातील शाळांना गुणपत्रिकांचे वितरण करण्यात आले. त्यानंतर दुपारी तीन शाळांमध्ये गुणपत्रिकांचे वाटप सुरू झाले. शहरासह जिल्ह्यातील विविध शाळांमधून गुणपत्रके नेण्यासाठी आलेल्या विद्यार्थी-पालकांच्या गर्दीने शाळांचे परिसर फुलले. गुणपत्रिका हातात मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता. उत्साही विद्यार्थी एकमेकाला गळाभेट देऊन तर, काहींनी ‘सेल्फी’ घेऊन आनंद व्यक्त केला.
दरम्यान, करिअरबाबत विद्यार्थ्यांचा कल समजावा यासाठी शासनाने यावर्षी दहावीतील विद्यार्थ्यांची फेब्रुवारीमध्ये कल चाचणी घेतली होती. त्याचा कल अहवालदेखील विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेसमवेत देण्यात आला. त्यात त्यांना ललितकला, तांत्रिक, वाणिज्य, आरोग्य व जैविक विज्ञान, कला अथवा मानव्यविद्या आदी विद्याशाखांचा करिअर निवडीबाबतचा प्राधान्यक्रम दिला आहे. शिवाय विद्यार्थ्याचा प्रतिसाद लक्षात घेऊन त्याला करिअरबाबतचा त्याचा कल कोणत्या विद्याशाखेमध्ये आहे ते कल अहवालात नोंदविण्यात आले आहे.
या कल अहवालावर विद्यार्थ्यांचे नाव, त्याचा बैठक क्रमांक तसेच विद्यार्थ्याचा ज्या क्षेत्रात विद्याशाखेकडे कल आहे. त्यातील करिअरच्या संधी, अभ्यासक्रम, कौशल्याधिष्ठीत अभ्यासक्रम, स्पर्धा परीक्षा, संरक्षण क्षेत्रातील संधी आदींची माहिती देण्यात आली आहे. या अहवालाबाबत विद्यार्थी, पालकांनी समाधान व्यक्त केले.