कोल्हापूर : ‘अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एक मुखानं बोला, बोला जय हनुमान’अशा गजरात कोल्हापूर शहरात हनुमान जयंती मंगळवारी विविध ठिकाणी भक्तिपूर्ण वातावरणात साजरी झाली. सोन्या मारुती चौक, उभा मारुती चौक, राजारामपुरी, संभाजीनगरसह तुळजाभवानी कॉलनी आदी उपनगरात सकाळी जन्मोत्सव, भजन-कीर्तनाच्या कार्यक्रमांसह भक्तांना सुठंवडा, प्रसाद वाटप करण्यात आले. यावेळी हनुमान भक्तांनी मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.उभा मारुती चौकातील मारुती मंदिरामध्ये सकाळी महिलांच्या हस्ते जन्मकाळ सोहळा झाला. शनिवार पेठेतील सोन्यामारुती चौक सेवा मंडळातर्फे सकाळी जन्मकाळ व त्यानंतर दुपारी महाप्रसाद वाटप करण्यात आले. महापालिकेजवळील समस्त दैव नामदेव शिंपी समाजातील हनुमान मंदिरात महाभिषेक पूजा, दुपारी कीर्तन, शिरा वाटप करण्यात आला. शनिवार पेठेतील काळाईमाम तालीमतर्फे मंदिरात जन्मकाळ आणि सुटवडा व शिरा वाटप करण्यात आला.गंगावेश येथील नाभिक समाजाच्या हनुमान मंदिरात जन्मकाळ, पूजा, अभिषेक, सुंटवडा आणि शिरा वाटप करण्यात आले. लक्ष्मण टिपुगडे यांनी हनुमानाची आकर्षक पूजा बांधली होती. श्री शनैश्वर मंदिरामध्ये चैत्र यात्रेनिमित्त हनुमंताची आकर्षक पूजा बांधण्यात आली होती. सानेगुरुजी वसाहतीमधील तुळजाभवानी कॉलनीतील स्वरराज चॅरिटेबल ट्रस्टकडून मारुती मंदिराजवळ महाप्रसाद वाटप करण्यात आला.
लवाजम्यासह शाही पालखी सोहळा
संभाजीनगरातील शहाजी वसाहत परिसरातील सद्गुरु श्री तोडकर महाराज आश्रमात द्रोणागिरी ट्र्स्टतर्फे द्रोणागिरी आश्रमात सकाळी ६ वाजून ३१ मिनिटांनी शंख, तुतारीच्या गजरात हनुमान जन्मकाळ झाला. अभिषेक, प्रवचन, आरती, जप करण्यात आला. महिलांनी हनुमंतरायाची पारंपारिक गीते म्हटली. सायंकाळी हनुमंताची आरती होऊन पारंपारिक लवाजम्यासह नयनरम्य आतषबाजी मध्ये शाही थाटात पालखी सोहळा पार पडला.
राजारामपुरीच्या मारुती मंदिरात फुलांची सजावट
राजारामपुरीतील मारुती मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाईसह फुलांची सजावट करण्यात आली होती. पुजाऱ्यांनी हनुमानाच्या मुर्तिस फुलांची आकर्षक पूजा बांधली होती. पहाटे अभिषेक, जन्मकाळ सोहळा, आरती असे विविध धार्मिक कार्यक्रम झाले. या मूर्तीचे जोतिबा यात्रेवरुन येणारे भाविक दर्शन घेत होते.