इचलकरंजी : शहर व परिसरात हनुमान जयंती मंगळवारी भक्तांविना साजरी करण्यात आली. सकाळी जन्मोत्सव साजरा करून मंदिरामध्ये पूजा-अर्चा करण्यात आली. त्यानंतर मंदिर बंद ठेवण्यात आले. कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने भाविकांना मंदिराच्या बाहेरूनच मारुतीचे दर्शन घ्यावे लागले.
कोरोनामुळे सर्वत्र परिस्थिती बिकट बनत असल्यामुळे लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व धार्मिकस्थळे बंद आहेत. त्यामुळे भक्तांनी संचारबंदीचे नियम पाळत घरीच विधीवत पूजा करून तसेच मंदिरातही पुजारी आणि एक-दोघांच्या उपस्थितीत जयंती साजरी केली. जयंतीनिमित्त सुंदरकांड, हनुमानाष्टक, हनुमान चालीसाचे पठण करून भारतावरील कोरोनाचे संकट टाळण्याचे संकटमोचक हनुमानाला साकडे घातले. शहरातील सोन्या मारुती, काळा मारुती, गांधी पुतळा चौक, गावभाग, नदीवेस नाका, जुना सांगली नाका, सोनपाऊली हनुमान मंदिर यासह शहरातील इतर भागांतील हनुमान मंदिरात मोजक्या दोन-चार भक्तांच्या उपस्थितीत उत्सव साजरा करण्यात आला.
फोटो ओळी
२७०४२०२१-आयसीएच-०१
इचलकरंजीत गांधी पुतळा परिसरातील मारुती मंदिर बंद असल्याने भक्तांना बाहेरूनच दर्शन घ्यावे लागले.