हुपरी : यळगूड (ता. हातकणंगले) येथील श्री हनुमान सहकारी दूध व्यावसायिक व कृषिपूरक सेवा संस्थेची वार्षिक विक्री उलाढाल ४८ कोटी ७ लाख रुपयांची झाली आहे. संस्थेच्या सभासदांना ४० टक्के लाभांश व सेवकांना २५ टक्के दीपावली बोनस देण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे संस्थापक सभापती सहकार महर्षी वसंतराव तात्यासाहेब मोहिते यांनी दिली.संस्थेच्या ४७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. सभेसमोरील सर्व विषयांना उपस्थित सभासदांनी टाळ््यांच्या गजरात एकमुखी मंजुरी दिली. अहवाल वाचन कार्यकारी संचालक सुजितसिंह मोहिते, सभेसमोरील विषय व नोटीस वाचन सरव्यवस्थापक एस. एस. सरनाईक, बजेट व हिशेब पत्रकांचे वाचन अकौंटंट अरुण कासोटे यांनी केले.मोहिते म्हणाले, गतवर्षीपेक्षा यावर्षीच्या वार्षिक विक्री उलाढालीमध्ये तीन कोटी ६५ लाखांनी वाढ झाली आहे. संस्था सुवर्णमहोत्सवाच्या दिशेने यशस्वी वाटचाल करीत आहे. अहवाल सालात २७ लाख १४ हजार ४७९ लिटर्स दुधाचे संकलन केले आहे. त्याचे ७ कोटी ३७ लाख ३८ हजार इतके दूध बिलाचे उत्पादकांना वाटप केले आहे. कार्यकारी संचालक सुजितसिंह मोहिते म्हणाले, संस्थेने शेतकरी, दूध उत्पादक, ग्राहक यांना ४७ वर्षांच्या कालावधित सर्व पूरक सुविधा पुरविण्याचे कार्य अखंडपणे सुरू ठेवले आहे. संस्थेच्या कार्याची दखल घेऊन शासनाने राज्य पातळीवरील सहकारातील प्रथम क्रमांकाचा सुवर्ण अक्षराने लिहून ठेवावा, असा पहिलाच ‘सहकार महर्षी पुरस्कार’ देऊन संस्थेला सन्मानित केले आहे. (वार्ताहर)
हनुमान दूध संस्थेची विक्रमी ४८ कोटींची विक्री
By admin | Published: July 24, 2014 10:52 PM