कोल्हापूर : हिमाचल प्रदेशातील धौलाधार आणि पीर पंजाल रांगेतील सर्वांत उंच व अवघड समजले जाणारे माऊंट हनुमान तिब्बा (उंची ५ हजार ९८२ मीटर (१९६२६ फूट) हे शिखर कोल्हापूरचा एसटी वाहक असलेला अमोल आळवेकर व त्यांच्या तीन साथीदारांनी ५ जुलै रोजी सर केले.माऊंट हनुमान हे अत्यंत अवघड शिखर सर करणारे आळवेकर हे एसटी महामंडळातील पहिले कर्मचारी ठरले आहेत. त्यांनी हिमालयातील बेसिक ॲडव्हान्स (गिर्यारोहण) प्रशिक्षण घेतले आहे. गेली वीस वर्षे महामंडळातील नोकरी सांभाळून त्यांनी यापूर्वी १७ हजार ३५३ फूट उंचीचे फ्रेंडशिप शिखरासह सह्याद्रीतील ३५ अवघड सुळकेही सर केले आहेत. आळवेकर यांनी हनुमान तिब्बा ही मोहीम २८ जून ते ११ जुलै अशी आखली होती. त्यानुसार सुरुवात केली. बकरर्थाच मार्गे भोजपथर येथे पहिला कॅम्प केला. पुढे मोरेन मार्गे टेंटू पास बेस कॅम, पुढे ५ जुलै २०२३ ला मध्यरात्री रात्रीच्या वेळी शिखराकडे जाण्यास सुरुवात केली. मध्यरात्री शिखराचा माथा गाठला आणि ही मोहीम फत्ते केली. यानंतर काही क्षणातच ९० किलोमीटर वेगाने सोसाट्याचा वारा व हिमवर्षाव सुरु झाला. त्यामुळे सुरक्षेच्या कारणावास्तव तत्काळ पुन्हा माघारी फिरण्याचा सर्व पथकाने निर्णय घेतला. या मोहिमेसाठी मंगळे कोयंडे, अरविंद नेवले, मोहन हुले यांचे मार्गदर्शन बहुमोल ठरले. यासह प्रा. प्रकुल मांगोरे-पाटील यांचे प्रोत्साहन मिळाले.
कोल्हापूरच्या एसटी वाहकाने केले हनुमान तिब्बा शिखर सर, मध्यरात्री गाठला शिखराचा माथा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 2:07 PM