लोकमत न्यूज नेटवर्क,
कोल्हापूर : गायन आणि बासरी वादन अशा अनोख्या जुगलबंदीत सोमवारी बासरी युगप्रवर्तक प्रसिद्ध पंडित पन्नालाल घोष स्मृती संमेलन बहरले. भोपाळचे प्रसिद्ध बासरीवादक पंडित अभय फगरे यांना यंदाच्या पंडित पन्नालाल घोष स्मृती पुरस्काराने प्रसिद्ध बासरीवादक नित्यानंद हळदीपूर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. देवल क्लबच्या अच्युतराव भांडारकर कलादालनात साेमवारी हा पुरस्कार सोहळा पार पडला.
पुरस्कारप्राप्त पंडित फगरे हे भोपाळ आकाशवाणीत कार्यरत असून, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, मोरोक्को, ब्राझील, न्यूझीलंड, आदी ठिकाणी त्यांच्या मैफली झाल्या आहेत. पुरस्कार मिळाल्यानंतर ते म्हणाले, युगप्रवर्तक बासरीवादक पन्नालाल घोष यांच्या नावाचा पुरस्कार मिळणे म्हणजे माझ्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे. या पुरस्कारामुळे माझी जबाबदारी आणखी वाढली आहे.
पुरस्कारानंतर बासरीवादक अनुपम वानखेडे व गायक सारंग फगरे यांच्यातील अनोखी जुगलबंदी रंगली. त्यांनी सुरुवातीला राग बिहाग सादर केला. विलंबित एकताल व द्रुत त्रितालातील रचना सादर केल्यानंतर त्यांनी एक धून सादर केली. त्यानंतर पंडित नित्यानंद हळदीपूर यांच्या बासरीवादनाची मैफलही सजली. त्यांना गिरीधर कुलकर्णी, प्रशांत देसाई यांची तबला, तर योगेश तावडे यांची तानपुरा साथ दिली. प्रास्ताविक व आभार संयोजक प्रा. सचिन जगताप यांनी केले. बासरीचा प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशाने दरवर्षी पंडितजींच्या नावे संगीत संमेलन व बासरी वादनाची मोफत शिबिरे आयोजित केली असल्याचे प्रा. जगताप यांनी आवर्जून सांगितले. यावेळी देवल क्लबचे श्रीकांत डिग्रजकर उपस्थित होते. माधवी देशपांडे यांनी स्वागत केले. या कार्यक्रमाला उत्स्फूर्त हजेरी लावली. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करत हा कार्यक्रम मोजक्याच रसिकांच्या उपस्थितीत झाला.
फोटो : २८१२२०२०-कोल-घोष पुरस्कार
ओळी : कोल्हापुरातील देवल क्लबच्या अच्युतराव भांडारकर कलादालनात सोमवारी बासरीवादक पंडित अभय फगरे यांना पंडित नित्यानंद हळदीपूर यांच्या हस्ते पंडित पन्नालाल घोष स्मृतिगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी श्रीकांत डिग्रजकर, प्रा. सचिन जगताप उपस्थित होते. (छाया - आदित्य वेल्हाळ)