गडहिंग्लज : मैदानी खेळातून शारीरिक तंदुरुस्ती वाढते, त्याहीपेक्षा खेळातून मिळणारा निर्भळ आनंद सर्वाधिक महत्त्वाचा आहे. त्यामुळेच नवोदित खेळाडूंनी केवळ जिंकणे हाच उद्देश न ठेवता खेळातून अधिकाधिक आनंद मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहा, असे आवाहन पुण्याचे माजी राष्ट्रीय फुटबॉलपटू परेश शिवलकर यांनी केले.
गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे नवोदित फुटबॉलपटूंना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. एम.आर. हायस्कूलच्या मैदानावर झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युनायटेडचे अध्यक्ष अरविंद बारदेस्कर होते. यावेळी उपाध्यक्ष मल्लिकार्जुन बेल्लद, संचालक प्रशांत दड्डीकर, अभिजित चव्हाण यांच्यासह खेळाडू व पालक उपस्थित होते. मनीष कोले यांनी आभार मानले.
आयलीग संघ हवा
एकेकाळी चार संघ असणाऱ्या महाराष्ट्रात आज एकही आयलीग संघ नाही. एकीकडे युवा आयलीग खेळणाऱ्या अकादमीच्या संघाची संख्या डझनहून अधिक आहे. पंजाब, गोवा, केरळ, बंगाल, मिझोराम याठिकाणी तेथीत संघ स्थानिक खेळाडूंना प्राधान्य देतात. परिणामी, महाराष्ट्राच्या खेळाडूंची कुचंबणा होत आहे. त्यासाठी राज्यात द्वितीय, प्रथम श्रेणी आयलीग संघ गरजेचा असल्याचे शिवलकर यांनी नमूद केले.
फोटो ओळी : गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे माजी राष्ट्रीय फुटबॉलपटू परेश शिवलकर यांचा सत्कार अरविंद बार्देस्कर यांनी केला. यावेळी मल्लिकार्जुन बेल्लद, मनीष कोले, प्रशांत दड्डीकर आदी उपस्थित होते.
क्रमांक : १५०३२०२१-गड-१०