मुंबई/कोल्हापूर - ज्याची भूमिका सत्याची असते त्याला चिंता करण्याचे कारण नाही, असे म्हणतराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापुरातील सभेतून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटावर जोरदार निशाणा साधला. अनिल देशमुख हा गृहमंत्री स्वाभिमानी माणूस होता. त्यांना सांगितले, तुम्ही आमच्या पक्षात या, गटात या आला नाहीत तर तुमची जागा आत आहे. देशमुखांनी स्पष्ट सांगितले. माझी जागा तुरुंगात असो वा कुठेही मी सत्याची साथ सोडणार नाही. कुठलीही तडजोड करणार नाही, असे शरद पवार म्हणाले. येथील भाषणात शरद पवारांनी चंद्रयान ३ मोहिमेच्या यशाचं कौतुक केलं. मात्र, देशात बेकारी आणि शेतकरी आत्महत्या गंभीर असल्याचंही ते म्हणाले.
पंडित नेहरुंच्या कार्यकाळात देशात इस्रोची स्थापना झाली. पंडित नेहरुंपासून ते आत्ताच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत सर्वच पंतप्रधानांनी या इस्रोच्या यशस्वीतेसाठी योगदान दिलं. त्यामुळेच, भारताने चंद्रावर आपलं यान यशस्वीपणे उतरवलं. चंद्रावर उतरलेलं हे यान तेथील परिस्थिती माहिती घेईल. तेथे पाणी किती आहे, तेथे शेती करता येईल की नाही, यावर अभ्यास करेल. चंद्रावर सोनं किती आहे, चांदी किती आहे, आणखी काय संपत्ती आहे का? याची माहिती आपल्याला समजेल. या माहितीच्या माध्यमातून मानवजातीच्या अधिक विकासाला गती मिळेल. मानवाला नवीन ऊर्जा मिळाल्याशिवाय राहणार नाही. या शास्त्रज्ञांचं अभिनंदन करणं ही आपली जबाबदारी आहे, असे म्हणत चंद्रयान ३ मोहिमेच्या यशस्वीतेबद्दल शरद पवार यांनी कौतुक करत शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं.
एकीकडे ही स्थिती असताना दुसरीकडे एक चित्र आहे. लोक महागाईने, बेकारीने त्रासलेले आहेत. चंद्रयान मोहिमेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांनीही कष्ट केले. महाराष्ट्रातील लोकांनी कष्ट घेतले. पण, दुसरीकडे नव्या पिढीत बेकारीचा संताप बघायला मिळत आहे. आमच्या हाताला काम द्या, कामाला दाम द्या हीच मागणी हा तरुण करुत आहे. तरुणांप्रमाणेच शेतकरीही हीच मागणी करत आहे. आपल्या महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात १८ दिवसांमध्ये २४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. जीव देणं ही साधी गोष्ट नाही, कुटुंबाची सगळी जबाबदारी सोडून प्राण सोडायला शेतकरी तयार होतो, याचा अर्थ त्याच्या जीवनात संकट आहे. काय संकट आहे? तर शेतीच्या मालाला किंमत येत नाही. त्यामुळे, कर्ज झालंय. कर्ज फेडल्या जात नाही. म्हणून शेतकऱ्याच्या अब्रूचे धिंदवडे काढले जातात. त्यामुळे, तो टोकाचं पाऊल उचलतो, असे म्हणत शरद पवार यांनी चंद्रयान मोहिमेबद्दल देशाचं कौतुक केलं. पण, दुसरी बाजू मांडताना बेकारी अन् शेतकरी आत्महत्येवरुनही सरकारला लक्ष्य केलं.