लोकमत न्यूज नेटवर्क --रत्नागिरी : स्थानिक बाजारपेठेत आवक वाढल्यामुळे हापूस सर्वसामान्यांच्या आवाक्यात येऊ लागला आहे. सद्य:स्थितीत झाडपिक्या आंब्यांचा डझनाचा दर अडीचशे रुपयांपर्यंत कमी झाला आहे. काढणीचा आंबा मात्र अजूनही साडेतीनशे रुपये डझन या दरानेच विकला जात आहे.झाडावरच पिकलेल्या आंब्याची रत्नागिरी बाजारातील आवक वाढली आहे. या आंब्यांचा कालावधी कमी असल्याने त्याचा दर आता साडेतीनशेवरून अडीचशे रुपयांवर आला आहे. बाजारात जागोजागी आंबा विक्री होत असून, सर्वत्र अडीचशे रुपये हाच दर आहे. लहान आकाराचे फळ दिडशे ते दोनशे रुपयांनाही विकले जात आहे.झाडावरून काढलेला आणि काही दिवस टिकेल असा (कच्चा) हापूस मात्र अजूनही साडेतीनशे रुपये दरानेच विकला जात आहे. स्थानिक बाजारपेठेत अशा आंब्याचे प्रमाण कमी आहे. अजूनही आंबा मोठ्या प्रमाणात मुंबई बाजारात पाठविला जात आहे. यावर्षी उष्म्याचा त्रास झाल्याने मोठ्या प्रमाणत फळ खराब झाले. तरीही आंब्याचे प्रमाण चांगले असल्याने यावर्षी दोन हजार किलोहून अधिक आंबा परदेशात गेला आहे.महामार्गावर मोठ्या प्रमाणात विक्रीसध्या मुंबई-गोवा महामार्गावर हापूस विक्रीने जोर धरला आहे. सुट्या सुरू असल्याने महामार्गावरील वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे आंबा विक्रीही चांगलीच वाढली आहे. तेथेही हापूसचा दर अडीचशे रुपयांपासून चारशे रुपयांपर्यंत आहे.अजूनही आंबा काढणी सुरूउशिरापर्यंत पडलेल्या थंडीमुळे मोहोर येण्याचा प्रकार उशिरापर्यंत सुरू होता. त्यामुळे अजूनही आंबा काढणी सुरू आहे. मे महिन्याअखेरपर्यंत आंबा काढणी सुरूच राहील, असे चित्र यंदा दिसत आहे.
हापूसची आवक वाढली; दर आवाक्यात
By admin | Published: May 10, 2017 11:07 PM