कोल्हापूर : सहकारी संस्थांमधील राजकारण वेगळे असते, कॉंग्रेस पक्ष म्हणून आमदार पी. एन. पाटील व आपण एकच आहोत, असा पुनरुच्चार पालकमंत्री सतेज पाटील यांनी केला. राहुल पाटील व जयवंतराव शिंपी ही तरुण-ज्येष्ठांची जोडी जिल्हा परिषदेमध्ये कामाचा ठसा उमटवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.शासकीय विश्रामगृहात सोमवारी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची नावे जाहीर केली. त्यावेळी मंत्री पाटील बोलत होते. मंत्री पाटील म्हणाले, दीड वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेमध्ये सत्तांतर करुन महाविकास आघाडीची सत्ता आणली.
आता अध्यक्षपदी राहुल पाटील तर उपाध्यक्षपदी जयवंतराव शिंपी यांना संधी दिली आहे. पाटील हे तरुण आहेत, तर शिंपी हे ज्येष्ठ व परिपक्व असल्याने काम उठावदार करतील. विरोधकांनीही निवडी बिनविरोध कराव्यात.ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, जिल्हा परिषदेची मुदत संपायला थोडा कालावधी राहिला आहे. या कालावधीतही तेथील कामाला गती देऊन गावे कोरोनामुक्त करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावा. यावेळी आमदार पी. एन. पाटील, आमदार राजेश पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, भय्या माने, उदयसिंह पाटील-कौलवकर, हंबीरराव पाटील, सतीश पाटील, शंकरराव पाटील उपस्थित होते.