लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : येथील गणेशनगरमध्ये अतिक्रमण केल्याची तक्रार केल्याच्या रागातून घरात घुसून मारहाण करण्यासह महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी शहापूर पोलिसात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडला.
रामचंद्र महादेव नवले, संपदा रामचंद्र नवले व बसवराज आप्पासाहेब कांबळे (तिघे रा. गणेशनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नांवे आहेत. याबाबत पोलिसतूंन मिळालेली माहिती अशी, फिर्यादी व संशयित हे परिसरात राहण्यास आहेत. रामचंद्र नवले यांनी नगरपालिकेच्या जागेत अतिक्रमण करुन बांधकाम केल्याप्रकरणी संबंधित महिलेने तक्रार दिली होती. या तक्रारीचा राग मनात धरुन संशयितांनी फिर्यादीच्या घरात घुसून शिवीगाळ व धक्काबुक्की करत तक्रारदार महिलेच्या मुलाच्या डोक्यात विटने मारहाण केली. त्यामध्ये तो जखमी झाला, तर मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करत विनयभंग केला. तसेच सर्वांना बघून घेतो, अशी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.