कोल्हापूर : वाघाचे काळीज आणि मर्द असाल तर भ्रष्टाचार बाहेर काढाच, त्यासाठी मुहूर्त कशाला बघता? असे उघड आव्हान ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी समरजित घाटगे यांना बुधवारी पत्रकार परिषदेत दिले. विधानसभा निवडणुकीत सहानुभूतीसाठी स्वत:च्या आईचा वापर करणाऱ्या व्यक्तीबाबत न बोललेच बरे, असा टोलाही त्यांनी लगावला.मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही एकत्र काम करीत आहोत. विकासावर काही बोलण्यासारखे नसल्याने हसन मुश्रीफ यांच्यावर बोललो तरच प्रसिद्धी मिळू शकते, असे त्यांना कोणी तरी सांगितले असेल. जनक घराण्यातील सांगणाऱ्यांची वैचारिक पातळी काय आहे? हे जिल्ह्याने पाहिले आहे.
हसन मुश्रीफ यांचे भ्रष्टाचार बाहेर काढू? असे घाटगे म्हणतात, यावर मंत्री मुश्रीफ म्हणाले, माझा भ्रष्टाचार बाहेर काढायला मुहूर्त कशाला बघता, कधीही काढा. त्यासाठी मात्र मर्द लागतो आणि वाघाचे काळीज लागते. विधानसभा निवडणुकीत आईला धमकीचा फोन आल्याची बतावणी केली होती. पोलिसांनी चौकशी केली असता आपणास आठवत नसल्याचे त्यांच्या आईनी सांगितले, या प्रकाराचा छडा लावण्याच्या सूचना आपण पोलिसांना दिल्या होत्या. त्यातून काहीच निघाले नाही, बतावणी करून निवडणुकीत सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न होता.
त्या राणीसाहेब आहेत, स्वत:च्या निवडणुकीसाठी त्यांच्या नावाचा वापर करणाऱ्या व्यक्तीबद्दल काय बोलायचे? माझ्यावर कारवाई व्हावी यासाठी पाच तास पोलीस ठाण्यात बसला तेवढा वेळ आईला धमकी दिल्यानंतर बसला असता तर जनतेने तुम्हाला मानले असते, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, आर. के. पोवार, आदिल फरास, संदीप कवाळे, उत्तम कोराणे, विनायक फाळके, आदी उपस्थित होते.
जन्मतारखेचा विषय संपलामाझा जन्म १९५३ ला रामनवमी दिवशी झाला, याचे पुरावे दिलेले आहेत. गेले ५० वर्षे वाढदिवस साजरा करतोय येथूनपुढेही करणार, कोणाच्या प्रश्नाला उत्तर देण्याची गरज नाही. माझ्याकडून हा विषय संपल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
भविष्य दिसत नसल्याने घाणेरडे राजकारण
ते वैफल्यग्रस्त झाले आहेत, भविष्य दिसत नसल्याने घाणेरडे राजकारण करण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे, त्याला फार महत्त्व देण्याची गरज नाही. त्यांन किंमत देत नसल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.