कोल्हापूर : माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जेव्हा जेव्हा कागलच्या शाहू सहकारी साखर कारखान्यांवर टीका करतात तेव्हा आमच्या कारखान्यास हमखास पुरस्कार मिळतो, असा चिमटा शाहू सहकार समूहाचे प्रमुख व भाजपचे नेते समरजित घाटगे यांनी कागल येथील मगर हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात काढला. विशेष म्हणजे या सर्व पुरस्कारांचे आतापर्यंत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याच हस्ते वितरण झाले आहे असेही त्यांनी म्हटले आहे.कारखान्यास राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचा देशातील सर्वोत्कृष्ट कारखाना म्हणून पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानिमित्त घाटगे यांचा सभासदांच्या वतीने सत्कार झाला. त्यामध्ये बोलताना समरजित घाटगे म्हणाले, कारखान्याच्या आतापर्यंतच्या वाटचालीत राज्य व राष्ट्रीय पातळीवरील ६६ पुरस्कार मिळाले आहेत. कारखान्याचे संस्थापक दिवंगत विक्रमसिंह घाटगे यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचे जिवंत स्मारक म्हणून या कारखान्याची उभारणी केली व त्याच विचाराने कारखाना चालवला. त्यांच्या निधनानंतर आईसाहेब सुहासिनीदेवी घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची वाटचाल तितक्याच दमदारपणे सुरू आहे. त्यात सभासद, कर्मचारी, आजी-माजी संचालकापासून सर्वांचेच श्रेय आहे.मुश्रीफांनी असेच टीका करत राहावेपरंतु यानिमित्ताने मला आणखी एका व्यक्तीचेही आभार मानायचे आहेत. आतापर्यंत जेव्हा जेव्हा हसन मुश्रीफ यांनी शाहू कारखान्यांवर टीका केली तेव्हा तेव्हा कारखान्यास हमखास पुरस्कार मिळाला आहे. मागच्या दोन महिन्यांत त्यांनी टीका केली तेव्हा वसंतदादा शुगर इन्सिट्यूटचा पुरस्कार मिळाला. ते टीका करत असल्याने मागच्या तीन वर्षांत कारखान्यास चार पुरस्कार मिळाले. त्याचे वितरणही ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याच हस्ते होत आहे, हे विशेष. त्यामुळे मुश्रीफ यांनी असेच टीका करत राहावे, त्यातून कारखान्यास पुरस्कार मिळत राहतील व प्रगतीही होत राहील.
मुश्रीफांनी टीका केली की कारखान्यास हमखास पुरस्कार; समरजित घाटगेंनी काढला चिमटा
By विश्वास पाटील | Published: September 20, 2022 6:57 PM