कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी स्वाभिमानी व कणखर आहे. कर्जमाफीसाठी राज्य सरकारचा प्रामाणिक हेतू त्यांना माहिती असल्याने तो रक्ताने पत्र कशासाठी लिहील. मात्र, काहीजण राजकीय स्टंटबाजीसाठीउद्योग करत असून, त्यातून जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकऱ्यांचा अपमान केल्याची टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांच्यावर केली.महिला दिनानिमित्त तपोवन मैदानावर महिला मेळाव्याची माहिती देण्यासाठी शनिवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मंत्री मुश्रीफ बोलत होते. ते म्हणाले, जिल्ह्यातील शेतकरी हा स्वाभिमानी असल्याने ९५ टक्के वसुली होते. त्यामुळे महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ जिल्ह्याला कमी मिळाला. अहमदनगर जिल्ह्यात २५५९ कोटी मिळाले. त्यामुळेच नियमित परतफेड करणा-यांना प्रोत्साहन दिले पाहिजे, यासाठी ५० हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्याचा निर्णय घेतला.