कोल्हापूर : राज्यातील सत्तांतरानंतर माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी बुधवारी मुंबईतील शासकीय निवासस्थान साेडले. हे निवासस्थान म्हणजे रुग्णांचे हक्काचे घर होते. ते सोडून जाताना रुग्णांबरोबर हसन मुश्रीफही भावुक झाले. त्यांनी रुग्णांना जड अंत:करणाने निरोप दिला.मुंबईतील बंगल्यावर मुक्कामी असणारे सुमारे ४० ते ४५ रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक सरकारी बंगल्यातून बाहेर पडताना भावुक झाले होते. अंजना गंगाराम कांबळे या त्यांचे पती गंगाराम कांबळे यांच्यावरील उपचारासाठी गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील आमदार मुश्रीफ यांच्या शासकीय निवासस्थानी मुक्कामी होत्या. त्या म्हणाल्या, “माझ्या पतीवर वेळेत उपचार केले गेले नसते, तर त्यांच्या शरीराची एक बाजू अपंग होण्याची भीती होती. आम्ही कऱ्हाडपर्यंत सर्वत्र जाऊन आलो, मात्र कुठेच ऑपरेशन होत नव्हतं. त्याचा खर्चही आम्हाला परवडणारा नव्हता. अखेर आमदार मुश्रीफ यांना भेटल्यावर आम्हाला मार्ग दिसला. त्यांनी स्वखर्चाने आम्हाला मुंबईत आणले आणि माझ्या पतीचे ऑपरेशन झाले. हसन मुश्रीफ हे आम्हाला परमेश्वरासारखे आहेत.”आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, पब्लिक ट्रस्ट कायद्याखाली नाेंदणी झालेले मुंबईतील अनेक दवाखाने गोरगरिबांना मोफत उपचार देत नव्हते. त्यासाठी कायदा केला आणि गेली १८ ते २० वर्षे लाखो गरीब रुग्णांवर उपचार झाले. मात्र, आता आमदार निवासातील खोल्या मिळण्यास थोडा कालावधी लागणार असल्याने रुग्ण सेवा खंडित होणार असल्याची खंतही त्यांनी बोलून दाखवली.
बंगल्यातच रुग्णांसाठी खोल्या
गेल्या १५ वर्षांपासून अविरतपणे दर आठवड्याला २५ ते ३० रुग्ण ग्रामीण भागातून मुंबईला आणणे आणि त्यांच्यावर मोफत उपचार करून सुखरूपपणे घरी पोहोचविण्याचे काम हसन मुश्रीफ यांच्यामार्फत केले जाते. मंत्रिपदाच्या काळात सरकारी निवासस्थानातील, तर आमदार असताना आमदार निवासस्थानातील खोल्या रुग्णांसाठी राखीवच ठेवल्या जातात.