राम मगदूमगडहिंग्लज : राष्ट्रवादीमधील बंडात अजित पवारांना पाठिंबा देण्याच्या निमित्ताने आमदार हसन मुश्रीफ आणि आमदार राजेश पाटील पुन्हा एकत्र आले आहेत. त्यामुळे गडहिंग्लज विभागाच्या राजकारणात ‘कागल-चंदगड’ची समझोता एक्स्प्रेस रुळावर आली आहे. दोघांच्या गळ्यात एकच हार आणि एका सुरातील भाषणे ऐकून दोघांची पुन्हा गट्टी जमल्याचे गडहिंग्लजमधील कार्यक्रमातून अधोरेखित झाले.गेल्यावेळची विधानसभा निवडणूक लढविण्यास तत्कालीन आमदार संध्यादेवी कुपेकरांनी असमर्थता दर्शवली. त्यामुळे शरद पवारांनी राजेश पाटील यांना उमेदवारी दिली. मुश्रीफ, कुपेकरांनी भक्कम साथ दिल्यामुळेच ते निवडून आले.तथापि, गडहिंग्लज कारखान्याच्या राजकारणात राजेश पाटील यांनी मुश्रीफविरोधी भूमिका घेतल्याने संध्यादेवी मुश्रीफांसोबत गेल्या. त्यामुळे ‘गोकुळ’च्या उमेदवारीवरून निर्माण झालेली दुफळी अधिक घट्ट झाली होती. परंतु, दोघांचेही समर्थक मनाने एकत्र आले तरच फायदा होईल, अन्यथा नाही.
संध्यादेवींची भूमिका गुलदस्त्यातमाजी आमदार संध्यादेवी कुपेकर व त्यांच्या कन्या डॉ. नंदिनी बाभूळकर यांची भूमिका अजूनही गुलदस्त्यात आहे. त्यांचे काही समर्थक मुश्रीफांसोबत तर काही पाटलांसोबत आहेत. परंतु, त्यांनी शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतल्यास दोघांनाही फटका बसू शकतो.घडले-बिघडले
- मे २०२१ : गोकुळच्या निवडणुकीत राजेश पाटील यांच्या आग्रहामुळेच मुश्रीफांना सतीश पाटील यांचे तिकीट कापून महाबळेश्वर चौगुले यांना उमेदवारी द्यावी लागली. याच निवडणुकीच्या निकालामुळे दोघेही मनातून दुखावले गेले.
- मार्च २०२२ : जिल्हा मजूर संघाच्या निवडणुकीत खुद्द मुश्रीफ व संध्यादेवींनी प्रचार करूनही स्व. कुपेकरांचे निकटचे सहकारी उदय जोशी यांच्यासह त्यांच्या पॅनलचा पराभव झाला. त्यामुळेच चंदगड राष्ट्रवादीत उभी फूट पडली.
- एप्रिल २०२२ : नेसरीतील राष्ट्रवादी परिवार संवाद मेळाव्यात निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याची तक्रार संध्यादेवींनी जाहीरपणे केली. परंतु, ‘कुरबुरी’ किरकोळ असून, त्या संपवण्याची ग्वाही मुश्रीफांनी दिली होती. तरी दुफळी कायम राहिली.
- ऑगस्ट २०२२ : प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संध्यादेवींच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांशी चर्चा करून पक्षबांधणीसाठी वेळ देण्याची सूचना नंदाताईंना केली होती.
- नोव्हेंबर २०२२ : गडहिंग्लज कारखान्याच्या निवडणुकीत पाटील व मुश्रीफ दोघांनी परस्परविरोधी पॅनलचे नेतृत्व केले.
- मे २०२३ : मनवाड येथील कार्यक्रमात ‘चंदगड’चा भावी आमदार कुपेकर गटच ठरवेल, असा इशारा संध्यादेवींनी दिला होता.