Kolhapur: राष्ट्रवादी अजित पवार गटातून हसन मुश्रीफ, राजेश पाटील तर उद्धवसेनेकडून के. पी. पाटील, सत्यजित पाटील यांना उमेदवारी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 12:41 PM2024-10-24T12:41:30+5:302024-10-24T12:42:30+5:30
महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या घोषणा कधी
कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिली यादी जाहीर झाली असून यामध्ये ‘कागल’मधून पालकमंत्री हसन मुश्रीफ तर ‘चंदगड’मधून आमदार राजेश पाटील यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवारांची घोषणा झालेली नसल्याने त्याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले असून इच्छुकांची घालमेल वाढली आहे.
महायुतीकडून दहापैकी जवळपास आठ ठिकाणचे उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपने अमल महाडिक, राहुल आवाडे, शिंदेसेनेकडून चंद्रदीप नरके, प्रकाश आबिटकर, राष्ट्रवादी काँग्रेसने हसन मुश्रीफ, राजेश पाटील तर जनसुराज्य पक्षाकडून विनय कोरे व अशोकराव माने यांची नावे जाहीर करीत आघाडी घेतली आहे. महायुतीमध्ये ‘कोल्हापूर उत्तर’ व ‘शिरोळ’बाबत सस्पेन्स कायम ठेवला आहे.
उद्धवसेनेकडून के.पी.पाटील, सत्यजित पाटील यांना उमेदवारी जाहीर
‘बिद्री’ साखर कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील यांनी बुधवारी ‘मातोश्री’वर जाऊन शिवबंधन बांधले. महाविकास आघाडीकडून ‘राधानगरी’तून त्यांची व शाहूवाडीतून माजी आमदार सत्यजित पाटील यांची उमेदवारी काल, बुधावारी रात्री पक्षाने जाहीर केली.
‘राधानगरी’ मतदारसंघावरून २०१४ पासून मेहुण्यापाहुण्यात सुप्त संघर्ष आहे. त्याचा भडका २०१९ च्या निवडणुकीनंतर उडाला, दोघांमधील अंतर वाढत गेले. ‘बिद्री’च्या निवडणुकीत ए. वाय. पाटील यांनी बंड करत विरोधी आघाडीचे सारथ्य केले. कोणत्याही परिस्थितीत ही विधानसभा लढायचीच या इराद्याने ‘ए. वाय.’ हे गेल्या दोन वर्षांपासून कामाला लागले. लोकसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीला रामराम करत थेट शाहू छत्रपतींच्या प्रचारात उतरले. त्यावेळी खासदार शाहू छत्रपती व दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांनी ‘राधानगरी’तून उमेदवारीचा शब्द त्यांना दिला होता. मात्र, ‘बिद्री’च्या निवडणुकीतच के. पी. पाटील व सतेज पाटील यांच्यात ‘उमेदवारी’बाबत ठरले होते. हा मतदारसंघ कोणालाही जरी गेला तरी उमेदवारी मिळवून देण्याची जबाबदारी सतेज पाटील यांनी घेतल्याने ‘के. पी.’ निवांत होते.
मध्यंतरी, हा मतदारसंघ उद्धवसेनेला गेल्यानंतर ‘के. पी.’च्या उमेदवारीबाबत अडचणी निर्माण झाल्या होत्या. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा ‘ए. वाय.’ यांच्यासाठी आग्रह असल्याचे बोलले जात होते. त्यातून अगदी शेवटपर्यंत ‘ए. वाय.’ यांचे नाव आघाडीवर राहिले, पण सतेज पाटील यांच्या चाणक्य नीतीपुढे ‘ए. वाय.’ टिकले नसल्याची चर्चा सध्या मतदारसंघात आहे.
‘के. पी.’च ठरले भारी
महाविकास आघाडीची उमेदवारी मिळवण्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून के. पी. पाटील व ए. वाय. पाटील यांच्यात रस्सीखेच सुरू होती. हा मतदारसंघ उद्धवसेनेला गेल्यानंतर दोघांनीही ‘मातोश्री‘पर्यंत पोहचण्याचे मार्ग शोधण्यास सुरुवात केली. दोघांनीही तिथेपर्यंत पोहचून उमेदवारी पदरात पाडून घेण्यासाठी निकराचे प्रयत्न केले, पण यामध्ये ‘के. पी.’ हेच भारी पडले.