कोल्हापूर : राज्य सरकारच्या पावणेचार वर्षांतील कामकाजाचा कारभार चव्हाट्यावर मांडत राष्टÑवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच आव्हान दिले आहे. निवडणुकीतील आश्वासनांचा फज्जा उडाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांना उपाहासात्मक ‘आऊट स्टँडिंग चीफ मिनिस्टर’ पुरस्कार देऊन राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.
राज्यात भाजप-शिवसेनेचे सरकार आल्यानंतर राज्याच्या पातळीवर अनुभवी विरोधक म्हणून दोन्ही काँग्रेसमधील नेते अधिक आक्रमक होतील, असे वाटत होते; पण तसे झाले नाही, ऊस दरासह इतर प्रश्नांबाबत राष्टÑवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांचा अपवादवगळता विरोधक फारसे आक्रमक राहिले नाहीत.
उसाची एफआरपी, साखरेचे दर आणि शेतकरी संघटनांची भूमिका यावर राज्यात पहिल्यांदा आमदार मुश्रीफ यांनीच आवाज उठवला. थेट खासदार राजू शेट्टी यांच्यासह तत्कालीन सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांना अंगावर घेतले. विरोधातील एकही आमदार सरकारच्या कारभारावर बोलत नव्हता, त्यावेळी मुश्रीफ यांनी पश्चिम महाराष्टÑात राजू शेट्टी व मंत्री चंद्रकांत पाटील यांना जखडून ठेवण्याचे काम केले. त्या रागातून मंत्री पाटील यांनी मुश्रीफ यांना अनेकवेळा खिंडीत पकडण्याचा प्रयत्न केला तरीही नोटाबंदी, कर्जमाफीसह प्रत्येक मुद्द्यावर आमदार मुश्रीफ यांनी मंत्री पाटील व पर्यायाने भाजप सरकारला सातत्याने कोंडीत पकडले.
आता त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. राज्य सरकारच्या पावणेचार वर्षांच्या कारभाराचा पंचनामा करण्यासाठी त्यांनी अभिनव आंदोलन हातात घेतले. भाजपने निवडणुकीत दिलेली आश्वासने व सध्याच्या स्थितीवर बोट ठेवत थेट सरकारला प्रश्न करत मुख्यमंत्र्यांना उपहासात्मक ‘आऊट स्टॅँडिंग चीफ मिनिस्टर’ पुरस्कार दिला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात उपहासात्मक पुरस्काराचे वितरण करून मुख्यमंत्र्यांनाच आता आव्हान दिले आहे.
नोटाबंदी, कर्जमाफी, पेट्रोल-डिझेलची दरवाढ, प्राथमिक शाळा बंद, मराठा-लिंगायत-मुस्लिम-धनगर समाज आरक्षण, राज्यातील कायदा सुव्यवस्था, विकासकामे आदींवरून सामान्य जनतेच्या मनातील प्रश्नांना हात घालून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न मुश्रीफ यांनी केला. त्यामुळे हे आंदोलन अभिनव झालेच पण तितकेच प्रभावीही होऊ शकले.आंदोलनाची राज्यभर चर्चाआमदार मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या अभिनव आंदोलनाची चर्चा संपूर्ण राज्यभर सुरू आहे. अशाप्रकारचे उपहासात्मक आंदोलन महाराष्टÑात केवळ कोल्हापुरात करून मुश्रीफ यांनी सर्व विरोधी पक्षांनी लक्ष वेधून घेतले.