राजाराम लोंढे ।कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीची तयारी दाखवत राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी खासदार धनंजय महाडिक व प्रा. संजय मंडलिक यांच्यावर ‘हबकी’ डाव टाकला आहे. लोकसभा लढविण्याची त्यांची इच्छा नाही; पण महाडिक यांची भाजपाशी वाढलेली जवळीकता व मंडलिक यांना आवतन देऊनही शिवसेनेतूनच लढण्याची केलेल्या घोषणेमुळे ते पेचात सापडले आहेत. अशा परिस्थितीत पक्षाने आदेश दिला तर आपण तयार असल्याचेसांगून महाडिक-मंडलिकांना त्यांनी एकप्रकारे इशारा दिला आहे.
धनंजय महाडिक यांनी लोकसभा निवडणुकीत यश मिळविले. त्यामध्ये हसन मुश्रीफ यांचे परिश्रम व जोडण्याही महत्त्वपूर्ण ठरल्या. मुश्रीफ व महाडिक जोडी जिल्हा राष्ट्रवादीमय करतील, अशी भाबडी अपेक्षा कार्यकर्त्यांची होती; पण या नेत्यांमध्ये सहा महिनेही पटले नाही. आमदार सतेज पाटील यांनी मुश्रीफ यांच्या ‘शब्दा’वर लोकसभेला मदत केली. मात्र, धनंजय महाडिक यांनी विधानसभा निवडणुकीत ‘दक्षिण’ मतदारसंघात सारी रसद बंधू अमल महाडिक यांना पुरविली तेथूनच खरी धूसफूस सुरू झाली.
महाडिक यांनी राष्ट्रवादी बळकटीपेक्षा ‘युवा शक्ती’ व ‘भागीरथी महिला’ या संघटनांकडे अधिक लक्ष देऊन समांतर यंत्रणा सक्षम केल्याचा आरोप कार्यकर्त्यांतून होत राहिला. मनपा निवडणुकीत भाजप-ताराराणी आघाडीच्या उमेदवारांना मदत केल्याचा राग राष्टÑवादी व काँग्रेस नगरसेवकांत आहे. नगरपालिका, जि. प. निवडणुकीतही त्यांनी हीच भूमिका घेतल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दुखावले आहेत.त्यामुळे महाडिक यांना उमेदवारी डावलली तर मुश्रीफ यांच्याशिवाय दुसरा तगडा उमेदवार राष्टÑवादीकडे नाही; पण त्यांना अजूनही महाराष्ट्रतच राहायचे असल्याने जिल्हा बँकेच्या निवडणुकीपासून त्यांनी संजय मंडलिकांशी जुळवून घेतले.
मंडलिकांना राष्टÑवादीत आणण्यासाठी गेले वर्षभर मुश्रीफ प्रयत्नशील आहेत, ‘स्वर्गीय मंडलिक यांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिवाचे रान करू’, अशी घोषणा करीत त्यांनी अप्रत्यक्षपणे मंडलिकांची उमेदवारी जाहीर केली. मुश्रीफ यांच्या वक्तव्याने मंडलिक गटात खळबळ उडाली. त्याचा आपल्या गटाच्या एकसंधपणावर परिणाम होईल का? त्याचा कानोसा घेत प्रा. मंडलिक यांनी संयम ठेवत सस्पेन्स कायम राखला. शिवसेना सत्तेत आहे, आताच पत्ते खोलले तर विरोधकांच्या डावपेचास बळ मिळेल, हे मंडलिक यांना पक्के माहिती आहे. त्यामुळे ‘हमीदवाडा’च्या पोती पूजन कार्यक्रमात त्यांनी ‘आपण शिवसेनेतूनच लोकसभा निवडणूक लढविणार’ असल्याची घोषणा करून चर्चेला पूर्णविराम दिला. मंडलिक पत्ते खोलत नसल्याने मुश्रीफ यांनी गडहिंग्लजमधील कार्यकर्ता बैठकीत ‘मंडलिक राष्ट्रवादीत येणार नसतील तर लोकसभेच्या रिंगणात उतरू’ अशी गुगली टाकली.
महाडिक यांना विरोध केला आणि मंडलिक सोबत आले नाही तर पक्षश्रेष्ठी उमेदवारीची माळ गळ्यात टाकणार, तसे झालेच तर लोकसभा लढवायची आणि विधानसभेला नविद मुश्रीफ यांना उतरायचे, असेही ते करू शकतात.मुश्रीफ यांचे गणितधनंजय महाडिक यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दुखावल्याने ते मदत करतीलच हे सांगता येत नाही. त्याऐवजी संजय मंडलिक यांना राष्ट्रवादीत घेतले तर ‘दक्षिण’मध्ये सतेज पाटील, ‘करवीर’मध्ये पी. एन. पाटील, ‘राधानगरी’त ए. वाय. पाटील, ‘भुदरगड’मध्ये के. पी. पाटील, ‘चंदगड’ मध्ये संध्यादेवी कुपेकर व राजेश पाटील, ‘कागल’मध्ये स्वत:, ‘उत्तर’मध्ये सतेज पाटील व राष्टÑवादी अशी ताकद मिळेल. त्याशिवाय राधानगरी-भुदरगड, कोल्हापूर शहरात अजूनही स्वर्गीय मंडलिक यांची पुण्याई आहे, त्याचा फायदाही प्रा. मंडलिक यांना होऊ शकतो.