कोल्हापूर : गोडसाखर कारखान्याच्या प्रचाराच्या सभेतील माझ्या वक्तव्याबद्दल दोन कोटी रुपयांचा अबु्रुनूकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे आमदार मुश्रीफ यांनी म्हटले आहे. कारखान्याच्या निवडणुकीतील मतदानाच्या तोंडावर त्यांनी केलेला हा निव्वळ पब्लिसिटी स्टंट आहे, असा असा आरोप सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शनिवारी एका पत्रकाद्वारे केला आहे. या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मंडळ भ्रष्ट व मनमानी कारभारामुळे आर.बी.आय.च्या निर्देशानुसार बडतर्फ झाले होते. सहकारातील नव्या कायद्यानुसार गैरकारभार करणारे संचालक दहा वर्षांसाठी सहकारी संस्थेची निवडणूक लढविण्यास अपात्र ठरणार आहेत. न्यायालयाची लढाई कितीही पळून खेळत असले, तरी नव्या कायद्यानुसार मुश्रीफ यांची जिल्हा संचालकपदाची अपात्रता अटळ आहे. गोडसाखर गडहिंग्लज कारखान्याच्या निवडणूक प्रचारसभेतील माझ्या कथित वक्तव्याबद्दल दोन कोटी रुपयांचा बदनामीचा दावा दाखल करण्याचा इशारा मुश्रीफ यांनी दिला आहे. कथित वक्तव्याबद्दल राजकीय विरोधकांवर बदनामीच्या दाव्याची धमकी देणे यात मुश्रीफ यांचा हातखंडा आहे. कारखान्याच्या आज, रविवारी होत असलेल्या मतदानाच्या तोंडावर आपण धुतल्या तांदळासारखे स्वच्छ असल्याचा दावा करून मतदारांची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने मुश्रीफ यांनी ही स्टंटबाजी केली आहे. सभेतील आमच्या वक्तव्याबद्दल न्यायालयीन कारवाई करणार असतील तर त्यांचे स्वागतच आहे, असेही या प्र्रसिद्धिपत्रकात मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)
...हा तर हसन मुश्रीफ यांचा पब्लिसिटी स्टंट
By admin | Published: March 27, 2016 1:08 AM