काेल्हापूर : राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. त्यांना थोडास ताप व कणकण असल्यामुळे रुग्णालयात दाखल केल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.
मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी सोमवारी (दि. १३) आरोप केले होते. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याला झालेला अर्थपुरवठा चुकीचा असल्याचे सोमय्या यांचे म्हणणे आहे. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात सोमय्या यांच्या विरोधात असंतोष पसरला आहे. त्यांनी ‘ईडी’कडे तक्रार करून कोल्हापूरला येणार असल्याचे भाजपने जाहीर केल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या रोषात आणखी भर पडली आहे. त्यातच मंत्री मुश्रीफ यांना मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याची वृत्त पसरल्याने राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. याबाबत मंत्री मुश्रीफ यांच्या निकटवर्तीयांकडे चौकशी केली असता, गेली दोन दिवस त्यांना ताप व थोडी कणकण होती. दक्षता म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल केले असून, आता त्यांची प्रकृती चांगली असल्याचे सांगण्यात आले.