हातकणंगले/बुबनाळ/आळते : कृष्णा-पंचगंगा नद्या प्रदूषित करणाऱ्या घटकांवर तातडीने कडक कारवाई करावी. याकरिता नृसिंहवाडी, बुबनाळसह नदी पलीकडील औरवाड, गौरवाड, आलास, कवठेगुलंद, शेडशाळ, गणेशवाडी, आदी सात गावांनी पुकारलेल्या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून बंद शंभर टक्के यशस्वी झाला. हातकणंगले, आळते येथेही बंद पाळण्यात आला.
औरवाड येथे शिरोळचे नायब तहसीलदार जे. वाय. दिवे यांना निवेदन देण्यात आले. त्यांनी वरिष्ठांकडे मागण्या पोहोचवू, असे आश्वासन दिले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर गायकवाड उपस्थित होते.बुबनाळ येथील सभेत जनआंदोलनाबरोबर प्रसंगी नद्या प्रदूषित करणाºया घटकांवर कारवाई करण्यासाठी प्रसंगी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.
दरम्यान, इचलकरंजी शहरासाठी नळ पाणीपुरवठा योजनेसाठी सत्तर कोटी निधी शासनाने मंजूर केला आहे. तो निधी कृष्णा व पंचगंगेच्या शुद्धिकरणासाठी वापरावा असे आवाहन डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी यावेळी केले. तर दत्त उद्योग समूह भविष्यातही आंदोलनकर्त्यांच्या पाठीशी उभा राहील, अशी ग्वाही दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी यावेळी दिली.
बुधवारी सकाळी नृसिंहवाडी, बुबनाळसह नदीपलीकडील सात गावात बंदला सुरुवात झाली. सकाळी नऊच्या सुमारास बुबनाळ येथे अनंत धनवडे व दादेपाशा पटेल यांच्या नेतृत्वाखाली फेरी काढण्यात आली. त्या फेरीचे रूपांतर सभेत झाले. या सभेत जि. प. सदस्या परवीन पटेल, पं. स. सदस्या रूपाली मगदूम, डॉ. मुकुंद घाटे-पुजारी, डॉ. किरण आणुजे, अॅड. प्रकाश भेंडवडे, रणजित पाटील, मल्लाप्पा चौगुले, मुकुंद पुजारी, धनाजीराव जगदाळे, विभावरी गवळी, विनिता पुजारी, सरपंच ललिता बरगाले, आदींनी दूषित पाण्यामुळे होणारे दुष्परिणाम सांगितले.
यावेळी सुकुमार किणिंगे, अर्चना धनवडे, विकास पुजारी, शफी पटेल, अफसर पटेल, नासीर पठाण, महावीर मगदूम, ग्रामस्थ उपस्थित होते.
हातकणंगलेत मोर्चाहातकणंगले येथेही अमृत पाणी योजनेला विरोध व वारणाकाठच्या गावांच्या समर्थनार्थ बुधवारी सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आला. तसेच दानोळी ग्रामस्थांवर दाखल केलेल्या गुन्ह्याचा निषेध केला. सकाळी अकरा वाजता हातकणंगले तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला; पण तहसीलदार, नायब तहसीलदार उपस्थित नसल्यामुळे निवेदन सरपंच रोहिणी खोत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने हातकणंगले पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक सीताराम डुबल यांना दिले. या मोर्चामध्ये उपसरपंच चंद्रकांत जाधव, सर्व ग्रा. पं. सदस्य, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष आप्पासो एडके, वैभव कांबळे, संदीप कारंडे, गुंडा इरकर, नूरमहंमद मुजावर, विजय खोत, शिवसेनेचे मधुकर परीट, ग्रामस्थ उपस्थित होते.आळतेकरांचाही विरोधआळते येथे एकदिवसीय बंद पाळण्यात आला. याबाबत आमदार सुजित मिणचेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, वारणाकाठच्या लोकांना पाठिंबा व्यक्त करून एक थेंबही पाणी अमृत योजनेला देऊ देणार नाही, अशी भूमिका स्पष्ट केली. आळते गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून इचलकरंजीच्या अमृत योजनेला विरोध दर्शविला.औरवाड (ता. शिरोळ) येथे निवासी नायब तहसीलदार जे. वाय. दिवे यांना इचलकरंजी वारणा पाणी योजनेला विरोध दर्शवणारे निवेदन देण्यात आले. यावेळी राजेंद्र पाटील-यड्रावकर, गणपतराव पाटील, जि. प. सदस्या परवीन पटेल, पं. स. सदस्या रूपाली मगदूम, दादेपाशा पटेल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.