अभय व्हनवाडे।रुकडी माणगाव : पशुपालन करण्यामध्ये आघाडीवर असणाºया हातकणंगले तालुक्यात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची वानवा असल्याने सुसज्ज असलेले पशुवैद्यकीय दवाखाने वैद्यकीय अधिकाऱ्यांअभावी ओस पडले आहेत. ‘जनावरे दवाखान्यात, तर डॉक्टर तालुक्यात’, अशी परिस्थिती तालुक्यातील प्रत्येक पशुवैद्यकीय दवाखान्यात असल्याने या मुक्या प्राण्यांवर उपचारअभावी हाल होत आहेत.
जिल्ह्यात हातकणंगले तालुका दूध उत्पादनांमध्ये अग्रेसर आहे. मुक्तगोठा ही संकल्पना ग्रामीण भागात रुजत आहे. सद्य:स्थिती पाहता काहीतरी करावे याकरिता युवक दुग्ध व्यवसायाकडे वळत आहेत; पण तालुक्यातील राज्य शासनाच्या चौदा व जिल्हा परिषदेच्या आठ पशू दवाखान्यात पशूंच्यावर उपचार करणारे वैद्यकीय अधिकारीच नसल्याने मोठी गैरसोय होत आहे. गंमत म्हणजे पशुधन पर्यवेक्षक, पशुधन विकास अधिकारी या जागा रिक्त असतील हे समजू शकले असते, पण खुद्द सहायक आयुक्तची पद रिक्त असून, या पदाचा पदभार प्रभारीपदाकडे असल्याने येथील कामकाज रामभरोसेवर सुरू आहे.
शासन एका बाजूला दुग्ध व्यवसाय वाढावा याकरिता जनावरांना गोठा बांधण्यापासून जनावर खरेदीकरिता अनुदान देत आहे. अनुदान प्रस्ताव तालुक्यातील पशुवैद्यकीय अधिकारी या कार्यालयाकडे दाखल करावा लागतो; पण या अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त कामकाज असल्याने तालुक्यात अधिकारी कधीतरीच दिसतात. यामुळे या प्रस्तावावर टिप्पणी व मंजुरी देण्यास विलंब होत असून, पशुपालक या कार्यलयास फेºया मारून वैतागत तर आहेतच पण, ‘मदत नको पण एकदा तरी भेटा’ अशी म्हणायची वेळ पशुपालकांच्यावर आली आहे.तालुक्यात या कार्यालयाची अवस्था बिकट झाली असून, पेठवडगाव व रुकडी, तळसंदे येथील पशुधन विकास अधिकारी यांची बदली होऊनही अद्यापही कार्यमुक्त करण्यात आले नाही. तर पट्टणकोडोली व हुपरी, साजणी येथील पशुधन विकास अधिकारी पद रिक्त आहे. तालुक्यातील बºयाच कार्यालयात पशुधन पर्यवेक्षक यांच्या अतिरिक्त कार्यभारावरच जुजबी कार्यभार चालत आहेत.
१ तालुक्यात चोकाक येथे सहायक पशुधन विकास अधिकारी कार्यरत आहेत, पण त्यांच्याकडे माणगाव, माणगाववाडी, साजणी, तिळवणी, रुई, अतिग्रे, माले, मुडशिंगी या कार्यालयाचा ही अतिरिक्त कार्यभार आहे.२ आठवड्यातून तीन दिवस मुख्य कार्यालयात राहाणे बंधनकारक असल्याने या अधिकाºयाने आठवड्यात कोणत्या दवाखान्यास कधी भेटायचे? हा प्रश्न उभा राहत आहे.
३ तर सहायक पशुधन विकास अधिकाºयांना हातकणंगले तालुक्याबरोबरच पन्हाळा, कोडोली त्याचबरोबर कोल्हापूर येथील अतिरिक्त कार्यभार दिल्याने या आधिकाºयांचा हेलपाट्यातच वेळ जात आहे.