दत्ता बिडकर --हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील नऊ जिल्हा परिषद मतदारसंघांमध्ये भाजप-जनसुराज्य आणि मित्र पक्ष आघाडीने मुसंडी मारत काँग्रेस आणि सेनेला जोरदार धक्का दिला आहे. जिल्हा परिषद निवडणूक निकालानंतर काँग्रेसचा जयवंत आवळे गट भुईसपाट झाला आहे, तर शिवसेना आमदार सुजित मिणचेकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपने स्वतंत्र उमेदवार उभा केला तर जनसुराज्यच्या राजीव आवळे यांनाही हा धोक्याचा इशारा आहे. तालुक्याचे राजकारण नव्या वळणावर येऊन ठेपले आहे.तालुक्यातील ११ जिल्हा परिषदपैकी ९ जिल्हा परिषद मतदारसंघ हातकणंगले विधानसभा मतदारसंघामध्ये समाविष्ट असून, कोरोची आणि कबनूर हे दोन जिल्हा परिषद मतदारसंघ इचलकरंजी विधानसभामध्ये समाविष्ट आहेत. हातकणंगले मतदारसंघातील ९ जिल्हा परिषदमध्ये भाजप आणि मित्र पक्षांनी जोरदार मुसंडी मारली आहे. हातकणंगले, हुपरी आणि शिरोली या तीन मतदारसंघामध्ये भाजप, तर घुणकी आणि भादोलेमध्ये जनसुराज्य पक्ष जिंकले आहेत. कुंभोज शिवसेनेने आणि रुकडी स्वाभिमानीने जिंकले. रेंदाळ आणि पट्टणकोडोली काँग्रेस पक्षातून बंडखोरी करून प्रकाश आवाडे यांच्या ताराराणी आघाडीने जिंकून काँग्रेसला धडा शिकविला आहे.हातकणंगले विधानसभेमधील ९ मतदारसंघात काँग्रेसने सर्वच ९ जागा लढविल्या. मात्र, एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. काँग्रेसला ९ ठिकाणी मिळून ३९,२२१ मते मिळाली. पट्टणकोडोली, हुपरी आणि रेंदाळ या तीन मतदारसंघात उमेदवाराची डिपॉझिट जप्त झाली. यापैकी रेंदाळ आणि पट्टणकोडोली या मतदारसंघात काँग्रेसचे बंडखोर आवाडे गटाचे उमेदवार विजयी झाले, तर हुपरीमध्ये आवाडे विरुद्ध आवळे यांच्या भांडणात भाजपचा उमेदवार विजयी झाला.भाजपने हातकणंगले, शिरोली, हुपरी आणि रेंदाळ हे चारच मतदारसंघ लढविले. यातील हातकणंगले, शिरोली, हुपरी मतदारसंघात विजय मिळविला; तर रेंदाळमध्ये कडवी झुंज दिली आणि एकूण ३८०७७ मते फक्त चार मतदारसंघात मिळविली.भाजपचा मित्रपक्ष जनसुराज्यने तीन मतदारसंघ लढविले. यामध्ये घुणकी, भादोले आणि कुंभोज या मतदारसंघांचा समावेश आहे. यापैकी घुणकी आणि भादोलेमध्ये जनसुराज्यने विजय मिळविला, तर कुंभोजमध्ये निसटता पराभव झाला तरीही या तीन मतदारसंघात जनसुराज्यने ३२४४५ मते मिळवली. १ भाजप आघाडीमध्ये निवडणुकीपूर्वी समझोता करून राष्ट्रवादीमधून बाहेर पडलेले माजी खासदार निवेदिता माने यांचे सुपुत्र धैर्यशील माने यांच्या युवक क्रांती आघाडीने रुकडी आणि पट्टणकोडोली हे दोन मतदारसंघ लढविले, मात्र, या आघाडीला एकही जागा मिळाली नाही. या आघाडीला १६६०१ मते मिळाली.२ शिवसेनेने घुणकी, कुंभोज, हातकणंगले, शिरोली (आघाडी) हुपरी, आणि रेंदाळ असे सहा मतदारसंघ लढविले. यापैकी कुंभोज या एकमेव मतदारसंघात शिवसेनेने विजय मिळविला. सहा मतदारसंघात शिवसेनेला ३५२६२ मते मिळाली. ३ आवाडे गटाने काँग्रेस विरुद्ध बंडखोरी करून काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध निवडणूक लढविली. आवाडे गटाने कोल्हापूर जिल्हा ताराराणी आघाडी तयार करून तीन मतदारसंघात निवडणूक लढविली. यापैकी पट्टणकोडोलीमध्ये शिवसेनेची मदत घेऊन ही जागा जिंकली; तर रेंदाळमध्ये कोणाचीही मदत नसताना स्वबळावर आपले पुत्र राहुल आवाडे यांची जागा जिंकून भाजप व आवळे काँग्रेसला धडा शिकविला. आवाडे यांच्या ताराराणी आघाडीला या तीन मतदारसंघात २७५४७ मते मिळाली. विधानसभा निवडणुकीत ही मते निर्णायक ठरतात.४ स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घुणकी, भादोले, कुंभोज, रुकडी आणि पट्टणकोडोली हे पाच मतदारसंघ लढविले. यापैकी रुकडी जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेना आणि आवाडे गट बरोबर समझोता करून स्वाभिमानीने रुकडीची जागा जिंकली. या पाच मतदारसंघात स्वाभिमानीला २४२८४ मते मिळाली.५ हातकणंगले विधानसभा मतदारसंघात आगामी काळात भाजप, जनसुराज्य आणि युवक क्रांती (माने गट) एकत्र राहिला तर काँग्रेसच्या जयवंत आवळे आणि शिवसेनेचे आमदार सुजित मिणचेकर यांना धोकादायक ठरणार.
हातकणंगलेचे राजकारण नव्या वळणावर
By admin | Published: March 01, 2017 12:43 AM