दत्ता बिडकर ।हातकणंगले : हातकणंगले ग्रामपंचायतीसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम सुरू झाला आहे.१० फेब्रुवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असून, सरपंच आणि चार सदस्य असल्यामुळे कामकाजाबाबत पेच निर्माण झाला असून, प्रशासक नियुक्त करण्यात आला आहे, तर सर्वपक्षीय कृती समिती नगरपंचायतसाठी आग्रही असून, अद्यापपर्यंत कोणीही उमेदवारी अर्ज दाखल केलेले नाहीत.
भाजपा सरकार शिरोळ आणि आजºयासाठी वेगळा न्याय, तर हातकणंगलेसाठी दुजाभाव करीत असून, तालुक्याचे आमदार, भाजपाचे दिग्गज नेते आणि नगरपंचायत कृती समितीची राजकीय इच्छाशक्ती हातकणंगलेबाबत कमी पडत असल्याचे स्पष्ट होत आहे.
आॅक्टोबर २०१७ मध्ये हातकणंगले ग्रामपंचायतची निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी नगरपंचायत होण्यासाठी गावामध्ये सर्वपक्षीय कृती समिती तयार झाली आणि सर्वांनुमते ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय सर्वपक्षीय कृती समितीने जाहीर केला. अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी सरपंचपदासाठी तीन अर्ज, तर इतर तीन प्रभागांमध्ये अर्ज दाखल झाले आणि सरपंच व चार सदस्यांसाठी निवडणूक झाली. परिणामी, कृती समितीत फूट पडली.
सरपंच आणि चार सदस्य निवडून आल्यामुळे पहिली सभा बोलविण्यामध्ये कायदेशीर अडचणी आल्या. यामुळे निवडून आलेल्या सरपंच व चार सदस्यांना काम करणे अवघड झाले. १७ सदस्यांच्या सभागृहामध्ये फक्त चारच सदस्य व सरपंच असल्यामुळे ग्रामपंचायतीचा कारभार करणे अवघड व मुश्कील झाल्यामुळे जिल्हा परिषदेने हातकणंगले ग्रामपंचायतीवर १९ जानेवारीला पंचायत समितीच्या विस्तार अधिकाºयांना प्रशासक म्हणून नियुक्त केले. निवडणूक आयोगाने हातकणंगले ग्रामपंचायतीच्या१३ रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून,५ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारीपर्यंत अर्ज दाखल करून २५ फेब्रुवारीला मतदान आहे.
नगरपंचायत व्हावी अशी सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. आॅक्टोबरमध्ये भाजपा आमदार सुरेश हाळवणकर यांनी हातकणंगले ग्रामस्थांना ठोस आश्वासन दिले होते. आचारसंहिता संपताच नगरपंचायत मंजुरीचे पत्र घेऊन जाण्यासाठी मुंबईत या, असे सांगितले होते. तर नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आमदार हाळवणकर, आमदार मिणचेकर आणि आमदार अमल महाडिक यांच्या सोबतीने नगरपंचायत कृती समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन नगरपंचायत मंजूर करण्याची विनंती केली होती.कृती समितीचा जनरेटा ठरतोय कमीभाजपा सरकारने सहा महिन्यांपूर्वी आजरा नगरपंचायत मंजूर केली. मंगळवारी (दि. ६) शिरोळ नगरपंचायतीची घोषणा केली. या दोन्ही ठिकाणी नेते प्रबळ आणि राजकीय वजनदार होते म्हणून नगरपंचायती मंजूर झाल्या, तर हातकणंगलेमध्ये उलटी स्थिती निर्माण झाली आहे. हातकणंगलेचे सेना आमदार सुजित मिणचेकर, भाजपाचे आमदार सुरेश हाळवणकर, आमदार अमल महाडिक हे तालुक्यामध्ये राहणारे आणि शासनामध्ये दबदबा असलेले नेते आहेत. यांच्यासह तालुक्यामधील अनेक भाजपाचे दिग्गज कार्यकर्ते आणि सर्वपक्षीय नगरपंचायत कृती समितीचे राजकीय वजन आणि इच्छाशक्ती हातकणंगले नगरपंचायतीसाठी कुचकामी ठरत आहे.