राज्यात भाजपाला पाठिंबा दिलेले आमदार प्रकाश आवाडे हे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून ताराराणी पक्षाच्या वतीने निवडणूक लढवणार आहेत, अशी घोषणा काल त्यांनी केली होती. यामुळे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या अडचणी वाढल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. आवाडे यांनी घोषणा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सीएम शिंदे आणि आवाडे यांच्यात तासभर बैठक झाली. 'आपली जरी त्यांच्याशी चर्चा झाली असली तरी मंगळवारी १६ एप्रिल रोजी आपण अर्ज भरणार असल्याचे आवाडे यांनी सांगितले. या बैठकीला आमदार विनय कोरे, सदाभाऊ खोत हेही उपस्थित होते.
हातकणंगलेमधून प्रकाश आवाडे उतरणार लोकसभेच्या रिंगणात, महायुतीला मोठा धक्का
हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून प्रकाश आवाडे निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचे बोलले जात आहे. आज कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील नेत्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेतली. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. सुमारे एक तास ही बैठक सुरू होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या बैठकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपचे नेते उपस्थित होते. हातकणंगले मतदार संघातून खासदार धैर्यशील माने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पण, आता भाजपाला पाठिंबा दिलेले आमदार प्रकाश आवाडे यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली आहे. यामुळे धैर्यशील माने यांच्या अडचणी वाढल्याचे बोलले जात आहे. आजच्या बैठकीत प्रकाश आवाडे उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाडे यांनी माघार घ्यावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्याची आपली भूमिका
आवाडे यांच्या या उमेदवारीच्या निर्णयामुळे हातकणंगले मतदारसंघातील राजकीय गणिते बिघडण्याची शक्यता आहे. प्रकाश आवाडे म्हणाले सध्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील राजकीय स्थिती पाहता अतिशय अटीतटीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. या पार्श्वभूमीवर राहुल आवाडे यांनी स्वतंत्र सर्वे केला असता यामध्ये माझ्या नावाला चांगली पसंती असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानुसार आपण स्वतः हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहोत. निवडून येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्याची आपली भूमिका आहे. तसेच खासदार कसा असावा, खासदार काय करू शकतो हे मी दाखवून देणार आहे. आपली याबाबत कोणाशीही चर्चा झालेली नसून सध्याच्या परिस्थितीचा विचार करून हा निर्णय घेतला आहे. माझी उमेदवारी भाजप पुरस्कृत नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.