गणपती कोळी कुरुंदवाड: हातकणंगलेलोकसभा मतदारसंघातील शिंदे गटाचे धैर्यशील माने उमेदवार जाहीर झाल्यानंतर ठराविक नेत्यांनाच भेटले. त्यांना आमचा विसर पडला आहे काय? जर त्यांना आमची गरज नसेल तर या निवडणुकीत त्यांना परिणाम भोगावे लागतील असा इशारा मयुर उद्योग समुहाचे प्रमुख व भाजपा नेते डॉ. संजय पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच माने यांना महायुतीतून घरचा आहेर मिळाल्याने राजकीय खळबळ उडाली.डॉ. पाटील म्हणाले, भाजपाच्या कमळ चिन्हावर या मतदारसंघात निवडणूक लढविण्यासाठी मी इच्छूक होतो. त्यासाठी मतदारसंघाचा दौराही केला होता. यापूर्वी या मतदारसंघातून मी निवडणूक लढविली आहे. त्यामुळे माझी ताकद सर्वांना माहित आहे. असे असतानाही तसेच माने यांच्या विरोधात संपूर्ण मतदारसंघात नाराजीचा सूर असतानाही आमच्यासारख्या नेत्यांकडे केलेले दुर्लक्ष त्यांना महागात पडेल असा इशारा दिला.मी सहकारात अडचणीत होतो तेव्हा मदतीसाठी कोणीही पुढे आले नाही. उलट अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र मी माझ्या हिंमतीवर अडचणीवर मात केली असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मतदारसंघातील प्रत्येक भागातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. भाजपाच्या केंद्रीय महामंडळाच्या संचालक पदावर असलेले व मतदारसंघातील वजनदार नेते माने यांच्या विरोधात गेल्याने महायुतीतील अंतर्गत वाद समोर आला आहे.
Hatkanangle Lok Sabha Constituency: ..तर परिणाम भोगावे लागतील, भाजपा नेत्याचा धैर्यशील मानेंना इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2024 2:36 PM