Hatkanangle Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकांची सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. महायुतीमध्ये उमेदवार यादी जाहीर झाली असून काही जागांसाठी अजूनही बैठका सुरू आहेत. दरम्यान, शिंदे गट काही उमेदवारांची उमेदवारी मागे घेणार असल्याचे बोलले जात आहे. याबाबत हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची चर्चा सुरू आहे, यावर खासदार धैर्यशील माने यांनी प्रतिक्रिया दिली.
"शिरसाट यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत कुठेही उमेदवार बदलणार असल्याचे संकेत दिलेले नाहीत. त्यांनी असं सांगितलं आहे की, बदलायचे असेल तर मला अशी कोणतीही कल्पना नाही. पण, बदलण्याचे अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आहेत. हे स्टेटमेंट म्हणजे बदलण्यासाठी कोणत्याही उमेदवाराचे नाव त्यांनी घेतलेलं नाही. पण, चर्चेचं उधाण एखाद्या मतदारसंघाबाबत करणे हे योग्य नाही, असं धैर्यशील माने म्हणाले.
"शिवसेनेला जर उमेदवार बदलायचा असता तर उमेदवारी जाहीर होण्याआधी बदलला असता. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कोणत्याही पद्धतीचा बदल होणार नाही. मी स्वत: एकनाथ शिंदे यांचा कार्यकर्ता म्हणून तुम्हाला आश्वस्त करतो, शिवसैनिक म्हणून प्रत्येक शिवसैनिक कामात गुंतला आहे. भाजपाचे कार्यकर्तेही कामात गुंतले आहेत. आता गती घेण्याची वेळ आहे. संभ्रम करण्याची वेळ नाही, कालची बातमी एप्रिल फुल म्हणून डोक्यातून काढून टाकावी. कार्यकर्ता म्हणून जे काम करायचं आहे, त्या कार्यकर्त्यांनी काम करायचं आहे. कामाला लागण्याचे आदेश पक्षाने दिले आहेत. माझ्या पार्टीने उमेदवारी दिल्यानंतर हा सिग्नल दिला आहे, त्यामुळे आता या शंका काढण्यात काही अर्थ नाही, असंही धैर्यशील माने यांनी सांगितलं.
'स्वाभिमानीच्या नावाखाली लाचारी पत्करतात'
"यांना जर स्वाभिमान असेल तर त्यांना लाचारी पत्करायची नसेल तर कुणाशी चर्चा करायचे कारण नाही. त्यांचा मार्ग त्यांनी निवडलेला आहे, पहिल्या दिवसापासून ते डायलॉग मारत आहेत. पण, दुसऱ्या बाजूला इलेक्शनच्या गणितासाठी म्हणून हे वैचारिक गणित नाही. ते साखर कारखानदारांसोबत युती करतात तेव्हा ती कोणती आयडॉलॉजी युती करतात.त्यामुळे ते आयडॉलॉजीकल युतीमध्ये पडत नाहीत, इलेक्ट्रोरियल युतीकडे लक्ष देतात, मी कसा निवडून येईल. एवढाच त्यांचा निव्वळ प्रयत्न सुरू आहे, असा आरोप खासदार धैर्यशील माने यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर केला.