आयुब मुल्लाखोची: दोन विधानसभा मतदारसंघ असणाऱ्या हातकणंगले तालुक्यावर यापूर्वीच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अन्याय केला. स्वतःच्या स्वार्थासाठी अन्य पक्षाबरोबर हातमिळवणी केली. स्थानिक नेत्याचं खच्चीकरणं केले. यापुढे तालुक्यावर राष्ट्रवादी काँग्रेस अन्याय होऊ देणार नाही. शरद पवार यांच्या पाठीशी कार्यकर्ते मोठ्या संख्येने आहेत. सर्व निवडणुका हिंमतीने लढवू असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी.पाटील यांनी केले.खोची येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातकणंगले तालुक्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. यावेळी ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. यावेळी माजी आमदार पक्षाचे प्रवक्ते राजीव आवळे, आर.के.पोवार प्रमुख उपस्थित होते. दरम्यान, तालुकाध्यक्ष म्हणून धनाजी करवते यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली.राजीव आवाळे म्हणाले, पूर्वीच्या जिल्हा अध्यक्षांनी स्वतःच्या तालुक्यापुरता पक्ष मर्यादित ठेवला. स्थानिक स्वराज्य संस्था तसेच सहकार निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांना बळ दिले नाही उलट माघार घ्यायला लावली. आता कार्यकर्ते मोठ्या संख्येने पक्षात येऊ लागले आहेत. तालुका सर्वात पहिल्यांदा शरद पवार यांच्या पाठीशी राहिला आहे. जिल्हा परिषदेवर चार सदस्य निवडून आणण्यासाठी आतापासून कामाला लागा असे त्यांनी सांगितले.यावेळी ज्येष्ठ नेते प्रा.बी.के.चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. सरपंच अभिजित चव्हाण, रोहित पाटील, फिरोज बागवान, बाहुबली गाठ, संजय शिंदे, सृष्टी पाटील, महंमद महात, अजय मस्के, धनाजी करवते, अनिल घाटगे यांची भाषणे झाली. मेळाव्यास नाना गाठ, डी.बी.पिष्टे, शिवाजीराव भोसले, एम.के.चव्हाण, अप्पासाहेब पाटील, उर्मिला जाधव आदी उपस्थित होते.
हातकणंगले तालुक्यावर यापुढे अन्याय होवू देणार नाही - व्ही.बी.पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2023 4:42 PM