कोल्हापूरजम्मू-काश्मीरच्या राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात महाराष्ट्राने आज आणखी एक सुपुत्र गमावला. कोल्हापूर जिल्ह्यातील निगवे खालसा येथील संग्राम शिवाजी पाटील यांना वीरमरण आलं आहे. एकाच आठवड्यात कोल्हापूर जिल्ह्यातील दोन जवान शहीद झाले आहेत.
संग्राम पाटील हे भारतीय सैन्यात हवालदार पदावर कार्यरत होते. जम्मू-काश्मीरमधील राजौरी सेक्टरमध्ये १६ मराठा पोस्टवर ते नियुक्त होते. संग्राम पाटील यांच्या जाण्याने निगवे खालसा गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. संग्राम पाटील यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.
काही महिन्यांनी निवृत्त होऊन संग्राम पाटील गावी परतणार होते. गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून ते घरी परतले नव्हते. फोनवरुनच त्यांची कुटुंबियांशी चर्चा होत होती. आज त्यांच्या जाण्याची बातमी घेऊन आलेल्या फोनने संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यावर शोककळा पसरली.
गेल्याच आठवड्यात कोल्हापूर जिल्ह्यातीलच जवान ऋषिकेश जोंधळे यंना अवघ्या २० व्या वर्षी वीरमरण आलं होतं. पाकिस्तानने १३ नोव्हेंबर रोजी शस्त्रसंधीचं उल्लंघन करत भारताच्या दिशेने बेछूट गोळीबार केला होता. भारतीय सैन्यानंही जशास तसं प्रत्युत्तर दिलं. पण यात महाराष्ट्राने आपला सुपुत्र गमावला.