कोल्हापूर : जिल्ह्यात सध्या कोरोना चाचणीचे प्रमाण वाढल्याने पॉझिटिव्ह रुग्ण संख्यादेखील झपाट्याने वाढत आहे. या रुग्णांवरील उपचारासाठी शहर व जिल्ह्यातील सर्व कोविड केअर सेंटर तयार ठेवण्याची सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी गुरुवारी केली. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जिल्ह्यात १ हजार बेड वाढवणार असल्याचे सांगितले.
काेरोनाचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी सायंकाळी पालकमंत्री पाटील जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. यावेळी त्यांनी रुग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्ह्यातील कोविड सेंटर, उपचारासाठीची सामग्री, डॉक्टर-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करा अशी सूचना केली.
जिल्ह्यात सध्या कोरोना संसर्ग उच्चांकावर आहे, लक्षणं असलेले व नसलेल्या लोकांकडून कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी मोठ्या प्रमाणात ॲंटिजेन व आरटीपीआर चाचणी केली जात आहे. त्यासाठी शहर व जिल्ह्यातील विविध भागात व तालुक्यांमध्ये मोहीम राबवली जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून रोज १० हजारावर कोरोना चाचणी केली जात असल्याने पॉझिटिव्ह रुग्णांची आकडेवारीदेखील झटक्यात २ ते अडीच हजारांपर्यंत गेली आहे.
या रुग्णांवर उपचार करण्यासाठी शहरात ५०० बेड व ग्रामीण भागात हजार बेड वाढवण्यात येणार आहे. या हजार बेडमध्ये किमान ३०० बेड हे ऑक्सिजनचे असतील अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली. गेल्यावर्षी जिल्हयात किती व कोणकोणते कोविड सेंटर सुरू होते याची माहिती मागवण्यात आली असून हे सेंटर पुन्हा सुरू करण्याची कार्यवाही केली जाईल असेही त्यांनी सांगितले.
--
तरच संस्थात्मक विलगीकरण
पॉझिटिव्ह रुग्णांचे गृहविलगीकरण बंद करण्यात आलेले नाही. ज्या रुग्णांच्या घरी स्वतंत्र राहण्याची व स्वच्छतागृहाची सोय नाही, त्यांच्यामुळे कुटुंबातील अन्य व्यक्तींना संसर्गाचा धोका आहे अशा रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केेले जाईल असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले.
---