कोल्हापूर : कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता जिल्ह्यातील बाराही तालुक्यांतील कोविड केअर सेंटर सज्ज करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक शुक्रवारी येथील पिवळ्या वाड्यात घेण्यात आली. यावेळी आवश्यक त्या साधनसामग्रीची मागणी नोंदवण्याचीही सूचना करण्यात आली.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा शल्यचिकित्सक अनिल माळी, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. उषादेवी कुंभार, माता, बालसंगोपन अधिकारी डॉ. फारूक देसाई यांनी या आरोग्य अधिकाऱ्यांच्या बैठकीत विविध सूचना केल्या.
पुन्हा एकदा जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यातील मुख्य शासकीय रुग्णालयांमध्ये कोरोनावरील रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र, हळूहळू रूग्ण संख्या वाढत आहे. गेले काही दिवस सलग सरासरी ७५ प्रमाणे नवे कोरोना रुग्ण आढळत आहेत. याच पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली.
ज्या ज्या ठिकाणी तालुक्याला याआधी कोविड केअर सेंटर्स कार्यरत होती ती त्याच पद्धतीने सज्ज ठेवणे, तेथील प्रक्रिया राबवण्यासाठीच्या आवश्यक मनुष्यबळाबाबतही नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. प्रत्येक ठिकाणी ४० बेडची तयारी करणे, ऑक्सिजनची उपलब्धता करणे याविषयी सविस्तर सूचना देण्यात आल्या. याआधी ज्या ठिकाणी अशी सेंटर्स कार्यरत होती तेथील आवश्यक साहित्य मागवणे, गरजेच्या औषधांचा साठा करून ठेवणे याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
गतवर्षी कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर सुरुवातीला सीपीआर रुग्णालयामध्ये या रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले. या ठिकाणी क्षमताही वाढवण्यात आली. मात्र, यानंतरही रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागल्यानंतर आयजीएम इचलकरंजी, उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लजपासून जिल्ह्यातील सर्वच मोठ्या शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले. अशी संख्या वाढत गेली तर पुन्हा त्याचा भार सीपीआरवरच पडू नये यासाठी आता बाराही तालुक्यांत हे नियोजन करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
कोट
आरोग्य विभागाच्या सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतलेल्या या बैठकीत अचानक रुग्णसंख्या वाढू लागली तर अडचण उद्भवू नये म्हणून हे काम हाती घेण्याबाबत सूचना दिल्या आहेत. शहराबराेबरच ग्रामीण भागातही रुग्णसंख्या वाढू लागल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
डॉ. योगेश साळे
जिल्हा आरोग्य अधिकारी