कोल्हापूर : देशाचे संरक्षण करणे आमचे कर्तव्य आहे. देशवासीयांनी आम्हा जवानांप्रती प्रेम, आदर आणि सन्मानाची वागणूक दिली, तर आम्हाला प्रोत्साहन मिळेल, अशी आशा मराठा बटालियनचे उपकमान अधिकारी लेफ्टनंट कर्नल गुरीन्दर सिंह यांनी शनिवारी व्यक्त केली. शहीद वीर जवान अभिजित सूर्यवंशी यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त साकोली काॅर्नर येथे सूर्यवंशी ट्रस्टतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी धर्मादाय आयुक्त कार्यालयातील अधीक्षक सूरज नाईकवडे होते. यंदाचा ‘बेस्ट जवान ऑफ दि इयर’चा सन्मान टी. ए. बटालियनचे जवान भीष्मा मोहिते यांना लेफ्टनंट कर्नल सिंह यांच्याहस्ते बहाल करण्यात आला.
लेफ्टनंट कर्नल गुरीन्दर सिंह म्हणाले, स्वतंत्रता दिन, प्रजासत्ताक दिन अशावेळीच आम्हा जवानांचे कौतुक करू नका. आमचे जवान सीमेवर तैनात असताना त्यांच्या मागे असणाऱ्या परिवाराला चांगली वागणूक द्या, हीच अपेक्षा आम्हाला आहे. गेल्या वीस वर्षांपासून शहीद अभिजित यांचे कुटुंब त्यांच्या स्मृती जागविण्याचे काम करीत आहेत, ही बाब कौतुकास्पद आहे.
यानिमित्त सिद्धी प्रकाश सूर्यवंशी व प्रियांका संजय चौगुले या दोन गुणवंत विद्यार्थिनींचा शिष्यवृत्ती देऊन सत्कार करण्यात आला. ट्रस्टचे विश्वस्त महेश धर्माधिकारी यांनी प्रास्ताविक केले. यंदाचे उत्कृष्ट जवान ठरलेले भीष्मा मोहिते हे मूळचे कवठेमहांकाळ (जि. सांगली) चे आहेत. त्यांची निवड ही वर्षभरातील कामगिरीवर करण्यात आली. यावेळी सुभेदार मेजर रामा धामणेकर, वीरमाता मनीषा सूर्यवंशी, नितीन सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.
फोटो : २६१२२०२०-कोल-अभिजित सूर्यवंशी
ओळी : कोल्हापुरातील शहीद जवान अभिजित सूर्यवंशी यांच्या स्मृतिदिनानिमित्त सूर्यवंशी ट्रस्टतर्फे दिला जाणारा ‘बेस्ट जवान ऑफ दि इयर’ बहुमान भीष्मा मोहिते यांना शनिवारी मराठा बटालियनचे लेफ्टनंट कर्नल गुरीन्दर सिंह यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी महेश धर्माधिकारी, मनीषा सूर्यवंशी, शिवराज नाईकवडे, रामा धामणेकर आदी मान्यवर उपस्थित होते. (आदित्य वेल्हाळ)