कोल्हापूर : शहरातील अतिक्रमणावरील कारवाईवरून फेरीवाले आणि महापालिका प्रशासनात वाद सुरू आहे. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आमदार चंद्रकांत जाधव, महापालिका प्रशासन यांची आज, सोमवारी दुपारी १ वाजता शासकीय विश्रामगृह येथे बैठक होणार आहे. या बैठकीत तोडगा निघणार की वाद चिघळणार, याकडे सर्वांच्या नजरा आहे.
महापालिकेने शहरातील अतिक्रमणांवर कारवाईची धडक मोहीम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात मंदिर, हॉस्पिटलचा १०० मीटर परिसर अतिक्रमणमुक्त करण्यात येणार आहे. फेरीवाल्यांनी या कारवाईला विरोध केला आहे. अंबाबाई मंदिर परिसरापासून याची सुरुवात करण्यात आली असून, महाद्वारापासून २५ मीटरपर्यंत फेरीवाल्यांना बंदी घातली आहे. येथेही काही फेरीवाल्यांचा विरोध आहे. महापालिकेने फेरीवाल्यांवर अन्याय करू नये, यासाठी सर्वपक्षीय कृती समितीने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे साकडे घातले आहे.