अनिल पाटील ।मुरगूड : मुरगूड शहरासह यमगे, शिंदेवाडी या गावांना पिण्याचे पाणी पुरवठा करणारा सर पिराजीराव तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. तलावामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हा विसर्ग मुरगूड-कापशी-गडहिंग्लज या रस्त्यावरूनच होत आहे. त्यामुळे साधारणत: दीडशे मीटर लांब व दोन फूट खोल पाण्यातूनच कसरत करीत वाहनधारकांना वाहने न्यावी लागत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून अनेक वाहने या पाण्यातून गेल्याने बंद पडली आहेत. त्यामुळे अनेकांना आर्थिक फटका तर बसला आहे; पण या ठिकाणचा रस्ता शेवाळल्याने लहान-मोठे अपघात दरवर्षी घडतात. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने या ठिकाणी उड्डाणपूल बांधणे गरजेचे आहे.
१९२०च्या सुमारास पडलेल्या दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आलेल्या राजर्षी शाहू महाराजांनी मुरगूड शहरासह यमगे, शिंदेवाडी या गावांतील ग्रामस्थांच्या मागणीवरून पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्यासाठी तलाव बांधण्याचे वचन दिले होते. यातूनच या ऐतिहासिक तलावाची निर्मिती झाली. प्रसिद्ध स्थापत्यकार सर विश्वेश्वरैया यांच्या मार्गदर्शनानुसार या तलावाचीबांधणी करण्यात आली असून, तलावामध्ये ज्या दिशेने पाणी येते त्याच दिशेने तलाव भरल्यानंतरमोठ्या प्रमाणात विसर्ग होतो.त्यामुळे तलावाच्या भिंतीवरअथवा भरावावर दाब येत नाही. हेच विसर्गाचे पाणी अत्यंत वेगाने मुरगूड-कापशी-गडहिंग्लज या रस्त्यावरूनच जाते.
मुरगूड शहरामध्ये कापशी, गडहिंग्लज या भागातून येणाऱ्या-जाणाºया प्रवाशांची संख्या जास्त आहे. या सर्वांना याच मार्गाचा वापर करावा लागतो. यातील काही प्रवासी एस.टी.ने, तर काही मोटारसायकलने प्रवास करतात. जर तलाव भरल्यावेळी पावसाचे प्रमाण जास्त असेल, तर या विसर्गाच्या ठिकाणी ये-जा करणे अत्यंत धोक्याचे असते. त्यातच ज्या ठिकाणी पाणी वाहते तो रस्ता अत्यंत निकृष्ट असून, मोठमोठे खड्डेही पडलेले आहेत. त्यामुळे पाण्याचा अंदाज येत नाही. यातूनच काही मोटारसायकलस्वार धाडसाने गाड्या घालतात. त्यातून अनेक अपघात घडले आहेत. काही वेळा पाण्याचा प्रवाह वाढला तर एसटी वाहतूकसुद्धा बंद केली जाते. पर्यायाने दौलतवाडी, करंजिवणे, हळदवडे, हळदी, बेनिक्रे, आदी गावांतील मुलांना शाळेला दांडी मारावी लागते.
या विसर्गाच्या पलीकडील म्हणजेच दौलतवाडी गावाकडील बाजूस काही वर्षांपूर्वी शासनाने आय.टी.आय.ची भव्यदिव्य इमारत बांधली आहे. या ठिकाणी कागल तालुक्यासह अन्य गावांतून शेकडो विद्यार्थी येतात. या सर्वांना मुरगूडकडून या पाण्यातूनचजावे लागते. या तलावातील पाणीपातळी स्थिर होण्यास साधारणत: एक दीड महिना लागतो. इतके दिवस या रस्त्यावरून अहोरात्र पाणी गेल्याने हा संपूर्ण रस्ता शेवाळला जातो आणि ज्यावेळी रस्त्यावरील पाणी पूर्णपणे बंद होईल,
त्यावेळी मोटारसायकल घसरून या ठिकाणी मोठे अपघात घडले आहेत. त्यामुळे तलाव भरल्यानंतर साधारणत: दीड-दोन महिने या ठिकाणाहून वाहनधारकांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो. तलाव भरल्यानंतर रस्त्यावरील पाण्याचा आनंद घेण्यासाठी एक-दोन दिवसांमध्ये शहरवासीय गर्दी करतात. त्यांच्या दृष्टीने उड्डाणपुलाची आवश्यकता नसेलही; पण क्षणिक आनंदापेक्षा एखाद्याचा जीव लाखमोलाचा असतो. त्यामुळे तत्काळ लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने या ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याच्या दृष्टीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.पुलाची मागणीया ठिकाणी दरवर्षी तलाव भरला आणि विसर्ग सुरूझाला की हा प्रश्न समोर येतो. अनेक वर्षांपासून या ठिकाणच्या उड्डाणपुलाबाबत मागणी होत आहे. याला अनुसरून पंचायत समितीचे उपसभापती विजय भोसले, माजी उपनगराध्यक्ष दगडू शेणवी, व्यापारी मित्र मंडळ यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे लेखी मागणी केली आहे.